ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, तिथे मी सिनियर प्रोफेसर’

छगन भुजबळ, संजय गायकवाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला आहे तसाच तो आमदारांनादेखील आहे. याबाबत माझे काहीही म्हणणे नाही. परंतु जी भाषा त्यांनी वापरली ती काही योग्य नाही. ते आताही शिवसेनेचे आहे म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार, मला त्यांना सांगायचं की, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, अशा शब्दांत राज्याचे अन्न नागरी व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांना टोला लगावला आहे.

मराठा आरक्षणावरून आ. गायकवाड यांनी ना. भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्यास भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भुजबळ म्हणाले की, गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे अपशब्ध वापरले ते एेकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे. त्यांच्या वक्तव्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहतील. ते म्हणाले की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला मंत्रिमंडळाबाहेर काढायचे की ठेवायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. संजय गायकवाड यांना कल्पना आहे की, त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे, मोदा जोशी आणि इतर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचा नेता म्हणून मी काम केलेले आहे, अशी आठवणही भुजबळ यांनी गायकवाड यांना करून दिली.

मी जे काही करतोय त्याबाबत अजित दादाही म्हणालेत

पक्षात घुसमट सुरु असल्याबाबत भुजबळ यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्षात काय घुसमट आहे? मी मंत्री आहे, माझ्या विरुद्ध अजून तरी कोणी काही बोललेले नाही. मी जे काही करतोय त्याबाबत अजित दादाही म्हणालेत की ते ओबीसींचे काम करत आहेत. त्यांना तो हक्क आहे. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलतात तसे ते देखील त्यांच्या समाजाबाबत बोलत आहेत, असे स्पष्टीकरणही भुजबळा यांनी दिले. मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलनाला बसणार आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे मोठे नेते आहेत,ते काहीही करू शकतात. काल त्यांनी बजेट मधून आरक्षण देण्याची मागणी केली, हे मला कधी सुचले नाही, असा टोला त्यांनी लगावला. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटबाबत भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल मी आभारी आहे, त्यांनी माझ्याबद्दल प्रेम दाखवले. झिशान आणि बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला याबाबत काही माहिती नाही. अजित पवार यांना या बद्दल माहिती असेल.

भाजपकडून कुठलेही प्रपोजल नाही

अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर अशी ‘एक्स’ पोस्ट केली आहे. याबाबत भुजबळ म्हणाले की, मला अजुन काही माहिती नाही. त्यांना कशी काय माहिती मिळाली, हेही मला माहीत नाही. मात्र, मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही, असे काही प्रपोजल मला आले नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, तिथे मी सिनियर प्रोफेसर' appeared first on पुढारी.