डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

नाशिक क्राईम न्यूज, www.pudhari.news

नाशिक पंटवटी : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी हॉस्पिटलमध्ये असतांना त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री नऊ वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यात डोक्यावर पगडी घातलेल्या हल्लेखोराने राठी यांच्यावर कोयत्याने जवळपास 18 वार केल्याचे दिसते आहे. राठी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. थरकाप उडविणाऱ्या या घटनेनं नाशिक हादरलं आहे.

अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीररित्या जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून हल्ल्याचा पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे. दरम्यान पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील बाजूस डॉ. राठी यांचे सुयोग हॉस्पिटल असून डॉक्टर शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये असताना एका ३० ते ३२ वयोगटातील संशयित डॉ. राठी यांना भेटण्यासाठी आला त्यावेळी डॉ. राठी व संशयित आरोपी यांच्यात बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दोघेही चर्चा करीत असतांना त्या ठिकाणी संशयित व डॉ. राठी यांच्यात काही शाब्दिक वाद झाले. संशयिताने धारदार कोयत्याने डॉ. राठी यांच्या डोक्यावर व मानेवर जवळपास 18 वार केले. डॉ. राठी यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेले त्यावेळी राठी कॅबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने राठी यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संशयित हल्लेखोर पसार

संशयित हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून रुग्णालयातील सी सी टी व्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे. संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला याचे मुख्य कारण समजू शकले नाही. सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राण घातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव , पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड , यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.

यावेळी सुयोग हॉस्पिटल परिसरात डॉक्टर राठी यांच्या मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. घटनेनंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी हॉस्पिटल मधील सी सी टि व्ही फुटेज पाहणी करून संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे.

हेही वाचा :

 

The post डॉ. कैलास राठींवर कोयत्याने १८ वार, सीसीटीव्ही फुटेज आले समोर appeared first on पुढारी.