काँक्रीटीकरणाने गुदमरतोय झाडांचा श्वास, पर्यावरणप्रेमी न्यायालयात

झाडांचे बुंधे कॉक्रीटीकरणात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक टाकताना वा रस्ते काँक्रीटीकरण करताना झाडांचे बुंधे मोकळे ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश असताना झाडांचे बुंधे सर्रासपणे काँक्रीटीकरण करून आवळले जात असल्याने पर्यावरणप्रेमींनी महापालिकेविरोधात दिवाणी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.

शहरातील झाडांभोवती काँक्रीटीकरण केल्याने झाडांची वाढ खुंटली जात असल्याची बाब पर्यावरणप्रेमी निशिकांत पगार यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये पुराव्यांसह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने महापालिकेला सुनावले होते. महापालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्षासंदर्भात योग्य ती जोपासना करण्यासाठी पावले उचलावी व वृक्षांच्या बुंध्याभोवती काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक टाकू नये अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने महापालिकेला दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही महापालिकेने वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत. झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रीटीकरण, डांबरीकरण करण्याचे तसेच पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम सर्रासपणे केले जात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याने पगारे यांनी महापालिकेविरोधात दिवाणी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयात दाखल याचिकेत वृक्ष संदर्भात परिस्थिती कथन करण्यात आली आहे. आदेश देऊनही महापालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्षांना पाणी मिळणार नाही, अशा प्रकारे पेवर ब्लॉक टाकले आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना थेट बुंध्यांवर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. डांबरीकरण करताना झाडांचे बुंधे आवळले गेले आहेत. यातून वृक्ष वाढीला मर्यादा येत असल्याची बाब अवमान याचिकेत नमूद करण्यात आली आहे.

झाडांच्या बुंध्यांभोवती काँक्रीटीकरण व डांबरीकरण करून तसेच पेव्हर ब्लॉक टाकून महापालिका न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करीत आहे. यामुळे पर्यावरणाला बाधा निर्माण होत असल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. – निशिकांत पगारे, याचिकाकर्ते.

हेही वाचा :

The post काँक्रीटीकरणाने गुदमरतोय झाडांचा श्वास, पर्यावरणप्रेमी न्यायालयात appeared first on पुढारी.