आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

दीक्षांत समारंभ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ दीक्षांत समांरभ उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस ऑनलाइन उपस्थित होते.

व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून व बेळगांवचे के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा, प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परिक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल बैस म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाचे कार्य महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी कोविडच्या काळात उल्लेखनीय काम केले आहे. पदवी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात सामाजिक भान जागृत ठेऊन मनोभावे रुग्णसेवा करावी. विकसित व आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत आपली सर्वांचे कार्य महत्वपूर्ण आहे. देशाच्या प्रगतीचा स्तर हा पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित असतो. शैक्षणिक बाबीचा महत्वपूर्ण स्तंभाचा आपण भाग असून प्रत्येकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान संपादन करुन जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनात नावलौकिक मिळवावा. संशोधनाला चालना मिळावी या हेतूने आरोग्य विद्यापीठाने विविध उपक्रम सुरु केले आहेत. त्याचा सकारात्मक उपयोग विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. नितीन गंगने म्हणाले की, आरोग्य शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजातील लोकांची आरोग्य सेवेद्वारे करावा. शिक्षण आणि आरोग्य विकासातील महत्वपूर्ण बाबी आहेत. शिक्षणाबरोबर संशोधनाची जोड असणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले. कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. परीक्षा नियंत्रण डॉ. संदीप कडू यांनी आभार मानले.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय : मुश्रीफ

विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यापीठामार्फत संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण यांवर मोठया प्रमाणात काम करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांकरीता कौशल्य आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जागतिक स्पर्धेत अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन यात क्रांती होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत आणि रुग्णसेवेमध्ये व्यग्र रहावे आणि काळानुरफप आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी. लिट‌् प्रदान

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना डी.लिट् ही विद्यापीठाची विशेष पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डिसूजा यांनी विद्यापीठाने केलेला सन्मान माझ्यासाठी उल्लेखनीय आहे. आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाचा विद्यापीठाकडून झालेला सन्मानाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आजवरच्या वाटचालीत मला कुटुंब, मित्र आणि विद्यापीठाकडून मिळालेले सहकार्यामुळे हा सन्मान शक्य झाला आहे. आरोग्य व रुग्ण सेवेच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा आदर्श घ्यावा असे काम सर्वांनी करावे असे त्यांनी सांगितले.

१२,४८६ स्नातकांना पदवी प्रदान

या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12,486 स्नतकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यास रोखरक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात appeared first on पुढारी.