तब्बल ४० दिवस उलटूनही पाणीपुरवठा नाही

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ४० ते ४५ दिवस उलटूनही नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नांदगाव – येवला रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता – रोको आंदोलन केले. नांदगाव नगरपरिषद मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा करतांना सापत्न पणाची वागणूक देत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.

दरम्यान, नांदगाव शहर व परिसराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन सातत्याने नादुरुस्त होत असल्याने पाणीपुरवठा करण्यास विलंब होत असल्याची हतबलता नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त करत पाईपलाईन दुरुस्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरालगत असलेले मल्हारवाडी या गावाला नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत गिरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन व माणिकपुंज धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सातत्याने फुटत असल्याने तसेच धरणावरील पाणी उपसा करणारे पंप देखील सातत्याने नादुरुस्त होत असल्याने शहर व परिसराचे पाणी नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे. शहरातील तब्बल ४४ भागांना पाणीपुरवठा करतांना २२ दिवस उलटून जातात त्यानंतर मल्हारवाडी गावाला पाणी दिले जाते मात्र गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या कारणांमुळे मल्हारवाडी गावाला पाणीपुरवठा झालाच नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज नांदगाव – येवला रस्त्यावर रास्ता – रोको आंदोलन करत ठिय्या मांडला.

महिलांनी पाण्याचे रिकामे हंडे वाजवत नगर परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आंदोलकांची बाजू समजून घेत नगरपरिषद प्रशासन व आंदोलक यांच्यात मध्यस्थी केली. यावेळी नगरपरिषद प्रशासनाकडून गणेश पाटील व बंडू कायस्थ यांनी नागरिकांना पाणी येण्यासाठी होत असलेला विलंब याबाबत अडचणींचा पाढाच वाचला. रोज पाइपलाइन लीकेज निघत असल्याने पाणीपुरवठा उशिरा होत असल्याचे कारण त्यांनी दिले. मात्र शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत असतांना मल्हारवाडी गावालाच पाणीपुरवठा करतेवेळी अडचणी का येतात असा सवाल ग्रामस्थांनी विचारला. दरम्यान, पाईपलाईन लीकेज दुरुस्त करून दोन दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी मल्हारवाडी ग्रामस्थांनी दिला.

हेही वाचा :

The post तब्बल ४० दिवस उलटूनही पाणीपुरवठा नाही appeared first on पुढारी.