तरण तलावांसाठीचे आजीवन सभासदत्व रद्द, ‘या’ कारणामुळे मनपाचा निर्णय

जलतरण तलाव नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाच तरण तलावांमध्ये हौशी जलतरणपटूंची गर्दी वाढू लागली असताना महापालिकेने १ एप्रिल २०२४ पासून कायमस्वरूपी आजीवन सभासदत्वच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाचही जलतरण तलावांची क्षमता ५६९३ इतकी असताना क्षमतेच्या तिप्पट अर्थात १६ हजार ८४१ व्यक्ती पोहण्यासाठी येत असल्यामुळे महापालिकेला हा कटू निर्णय घ्यावा लागला आहे.

महापालिकेच्या माध्यमातून नाशिकरोड विभागात राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, नाशिक पश्चिम विभागात स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, सिडकोत स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, सातपूर जलतरण तलाव, पंचवटीत स्व.श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव, या पाच जलतरण तलावांसह स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाशी सलंग्न हेल्थ सेंटर चालवले जाते. कोरोनाकाळात सरकारने जलतरण तलाव, स्पा, जिम, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यंटन स्थळे, मनोरंजन स्थळांवर निर्बंध लावले होते. महापालिकेनेही १५ मार्च २०२० पासून राज्यशासनाच्या आदेशानुसार पाच जलतरण तलावांसह हेल्थ सेंटर बंद केले होते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथील केले. परंतु,जलतरण तलाव मात्र बंदच ठेवले होते. पहिल्या लाटेपाठोपाठ दुसरी लाट आल्याने पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर मात्र, सर्व पाच जलतरण तलाव तसेच एक हेल्थ सेंटर शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी वाढती गर्दी लक्षात घेत महापालिकेने १ एप्रिल २०२३ पासून सर्व आश्रय दाते, आजीव सभासद, ज्येष्ठ नागरिक, माजी नगरसेवक महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी आजीव सभासद एक वर्षासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता १ मार्चपासूनच गर्दी पुन्हा एकदा वाढू लागल्याचे बघून महापालिकेने आता कायमस्वरूपी आजीवन सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.

खासगीकरणाचा घाट?

महापालिकेच्या जलतरण तलावांमधील आजीवन सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्याच्या निर्णयामागे या तरण तलावांचे खासगीकरण केले जाणार असल्याची चर्चा आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिका जलतरण तलाव सांभाळणे अवघड झाल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे.

अशी आहे जलतरण तलावांची स्थिती

राजमाता जिजाऊ जलतरण तलावाचे क्षेत्रफळ १९०० चौरस मीटर असून येथे २८५० सभासदांची क्षमता असताना ३२४० सभासद आहेत. स्वातंत्र्यवीर वीर सावरकर जलतरण तलावाचे क्षेत्रफळ १३२५ चौरस मीटर इतकी असून या ठिकाणी १९८७ सभासद संख्या आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये ९७०६ जलतरणपटू वार्षिक, मासिक, कौटुंबिक तसेच गेस्ट पास किंबहुना आजीव सभासदांच्या रूपाने घेतात. स्वामी विवेकानंद जलतरण तलावाचे क्षेत्रफळ ३२५ चौरस मीटर इतके आहे. क्षमता ४८८ असून या ठिकाणी १६१८ सभासद आहेत. तसेच सातपूर जलतरण तलावाची क्षमता ४८८ इतकी असून या ठिकाणी २२७७ इतके सदस्य पोहतात. क्षमतेच्या तीनपट व्यक्ती याठिकाणी पोहण्यासाठी येत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

यापुर्वी ज्यांना आजीवन सभासदत्व दिले, त्यांना पोहण्याची संधी आहे. मात्र त्यांनी नियमित देखभाल दुरूस्ती शुल्क भरणे आवश्यक आहे. नवीन व्यक्तींना आजीवन सभासदत्व मिळणार नाही. -लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त, महापालिका

हेही वाचा :

The post तरण तलावांसाठीचे आजीवन सभासदत्व रद्द, 'या' कारणामुळे मनपाचा निर्णय appeared first on पुढारी.