तरुणांनो, तुम्हाला इतिहास घडवण्याची संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरुणांची भागीदारी जेवढी अधिक असेल तेवढे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल. घराणेशाहीच्या राजकारणाने आजवर देशाचे नुकसान केले. घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आणण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांनी देशाला मोठे योगदान दिले. ते देशासाठी जगले आणि देशासाठीच देह ठेवला. काळ प्रत्येकाला त्याच्या जीवन काळात एक संधी देत असतो. भारतीय तरुणांना अमृतकाळात ही संधी आहे. आज तुमच्याकडे इतिहास घडवण्याची संधी असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१२) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशित प्रामाणिक, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री संजय बनसोड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो. जिजाऊंनी शिवाजीसारखा महानायक आपणास दिला. अहिल्यादेवीसारखी महाशक्ती महाराष्ट्राच्या धरतीने दिली. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले. महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक महापुरुष घडले. आजही आपण क्रांतिकारकांची आठवण करतो. त्यांनी इंग्रजांना नेस्तानाबूत केले. स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांनी देशाला मोठे योगदान दिले. ते देशासाठी जगले आणि देशासाठीच देह ठेवला. काळ प्रत्येकाला त्याच्या जीवन काळात संधी देत असतो असे मोदी यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या पाचमध्ये आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या पहिल्या तीनमध्ये आहे. एकापेक्षा एक इनोव्हेशन देशात होत आहेत. देशभरातून विक्रमी संख्येने पेंटेट दाखल होत आहेत. भारत विश्वाचे मॅन्युफॅक्चरिंग हब बनले आहे. या सर्वांचा आधार भारतीय युवापिढी आहे. या सामर्थ्यामुळे भारताचा जगभर डंका आहे. भारताच्या या यशामागे युवापिढी आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात देशाला नवीन उंचीवर नेण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही असे काम करा की, देशाचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. यामुळे तुम्हाला मी २१ व्या शतकातील सर्वात भाग्यशील पिढी समजतो. देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीनमध्ये आणण्याचे उद्दिष्ट असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

तुमचे मत मतदानातून व्यक्त करा

माझा सर्वाधिक विश्वास युवकांवर आहे. तुम्ही सक्रिय राजकारणात आलात, तर घराणेशाहीचा प्रभाव कमी कराल. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे किती नुकसान केले हे सर्वज्ञात आहे. लोकशाहीत आणखी एक पद्धत आहे. तुम्ही तुमचे मत मतदानातून व्यक्त करू शकता. अनेक तरुण पहिल्यांदाच मतदान करणारे असतील. ते देशात नवी ऊर्जा निर्माण करू शकतात. त्यामुळे मतदान यादीत तुमचं नाव येण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करा.

मोदींचे युवकांना तीन मंत्र

देशातील तरुण जेव्हा अधिकारांसोबत कर्तव्याचे पालन करेल, तेव्हाच समाज आणि देशाची उन्नती होईल, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तरुणांना तीन मंत्र दिले. युवकांनी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांचा वापर करावा, कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन करू नये आणि माता-भगिनींना शिव्या देणे बंद करावे, असे आवाहन मोदींनी केले.

भारताकडे अवघ्या जगाचे लक्ष : मुख्यमंत्री

महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी करत जी-२० चेही आयोजन करून जगाचे लक्ष वेधले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात २०४७ पर्यंत सशक्त व सुदृढ भारत विकसित करायचा आहे. त्यामध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांच्या ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीकडे मार्गक्रमण करा’ हा मंत्र युवकांना दिला.

एकसंध देशासाठी पुढाकार घ्या : ठाकूर

धर्म, जातपात आणि प्रांतवादाच्या नावावर देशाला तोडण्याचे काम केले जात आहे. देशविघातकांच्या या कृतीला विरोध करताना एकसंध भारतासाठी आजच्या युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी केले. प्रभू रामचंद्रांची भूमी असल्याने महोत्सवासाठी नाशिकची निवड केली. तीन वर्षांनी नाशिकला कुंभमेळा भरणार असून, तत्पूर्वी आज या तपोभूमीत युवा कुंभमेळा भरल्याचे कौतुकोद‌्गार त्यांनी काढले.

मराठीत भाषणाची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना आवाहन करताना आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले की, आजचा दिवस युवाशक्तीचा दिवस आहे. गुलामीच्या कालखंडात भारताला नव्या ऊर्जेने भारले होते. त्या महापुरुषाचा आजचा दिवस आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलो आहोत. आजच जिजाऊंचीही जयंती आहे. जिजाऊ या नारीशक्तीचं प्रतीक होत्या. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत यायची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो.

मंदिरांच्या स्वच्छतेची मोहीम

भारताच्या अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या धरतीशी राहिला आहे. हा काही योगायोग नाही. या पुण्य आणि वीरभूमीचा आणि तपोभूमीचा हा प्रभाव आहे. या धरतीवर राजमाता जिजाऊं माँसाहेबांनी शिवाजी महाराजांना घडवले. रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, हुतात्मा चाफेकर, हुतात्मा अनंत कान्हेरे बंधू आदी सुपुत्र याच भूमीने दिले. नाशिकच्या पंचवटीत प्रभू रामांनी बराच काळ घालवला होता. मी आज या भूमीला नमन करतो. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आपण देशाच्या तीर्थस्थानांची, मंदिरांची साफसफाई करू. स्वच्छतेचे अभियान राबवू. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचा, मंदिर परिसरात सफाई करण्याचे सौभाग्य मिळाले, तुम्हीही या अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन मोदींनी केले.

७५ दिवसांत एका कोटी नोंदणी

स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी देशासाठी आपले जीवन दिले. त्यांनी देशाला नवी स्वप्न दिली. आता ‘मेरा युवा भारत’ संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे. संघटनेची स्थापना होऊन ७५ दिवस झाले नाही तरी एक कोटीपेक्षा जास्त युवकांनी या संघटनेत नावनोंदणी केली आहे. तरुणांना मोकळीक देण्यासाठी सर्व अडथळे दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रात त्यांना वाव देण्याचा गेल्या १० वर्षांत प्रयत्न केला. आम्ही एक आधुनिक आणि डायनॅमिक इको सिस्टिम करायला घेतली आहे. नवे शिक्षण धोरण तयार केले. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. युवावर्गाला संधीचे नवे आकाशच सरकारने उघडले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या दुप्पट-तिप्पट वेगाने काम सुरू आहे. मोठमोठे महामार्ग निर्मिती, वंदे भारत ट्रेन, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, स्वस्तात मुबलक मोबाइल डाटा, हे सर्व तरुणांसाठी उपलब्ध करून दिले. आता अमृतकाळात विकसित राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी तरुणांच्या हाती आहे, असे मोदी यांनी सांगितले.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे…

* भारतीय तरुणांना इतिहास घडविण्याची सुवर्णसंधी.

* घराणेशाही संपविण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे.

* देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात टॉप ३ मध्ये आणण्याचे उद्दिष्ट.

* ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहित करा.

* युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी गेल्या सरकारपेक्षा अधिक वेगाने काम.

* लोकशाहीला नवी शक्ती, नवी ऊर्जा देण्यासाठी मतदान करा.

* राममंदिरात प्रतिष्ठापनेनिमित्त मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवा.

The post तरुणांनो, तुम्हाला इतिहास घडवण्याची संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी appeared first on पुढारी.