थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर

थंडीचा कडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निफाडला रविवारी (दि.२४) चालू हंगामातील सर्वात निच्चांकी ९.१ अंश तापमानाची नाेंद झाली. पाऱ्याच्या घसरणीमुळे तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. बदलत्या हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर होत आहे. तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत असल्याने सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत आहे. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाडचा पारा दहा अंशांखाली आला आहे. त्यामुळे अवघा तालुका गारठला आहे. पहाटेच्या वेळी तालुक्यावर धुक्याची चादर पसरत आहे. तर दवबिंदूमुळे द्राक्षबागांना धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत द्राक्षमण्यांमध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र, वाढत्या थंडीमुळे या प्रक्रियेला अडथळा निर्माण होताना द्राक्ष मणी फुगवणीवरही परिणाम होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अगोदरच अवकाळी व गारपिटीने संकटात सापडलेला द्राक्ष उत्पादकांचा पाय अधिक खोलात गेला आहे. द्राक्षपीक वाचविण्यासाठी शेतकरी पहाटे बागांमध्ये धुरी करतो आहे. दुसरीकडे मात्र गहू व हरभऱ्यासाठी हे हवामान पोषक मानले जात आहे. दरम्यान, नाशिकचा पारा १३.६ अंशांवर स्थिरावला असून, शहर-परिसरात पहाटे व रात्रीच्या वेळी थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातही थंडी कायम आहे.

हेही वाचा :

The post थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर appeared first on पुढारी.