दिंडोरीत रंगणार भाजपा-राष्ट्रवादीत सामना!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीत नाशिक मतदारसंघाच्या जागेवरुन महायुती व महाआघाडीतील घटक पक्षां मध्ये कलगीतुरा रंगला असताना दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काॅग्रेसने (शरद पवार गट) त्यांच्या उमेदवाराला तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लढतीचे चित्र तुर्तास स्पष्ट नसले तरी दिंडाेरीमध्ये भाजपा विरुद्ध शरद पवार गट असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्हे आहेत. (Dindori Lok Sabha 2024)

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यातील काही माेजक्या जागांवर महायुती व मविआतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे त्यामध्ये नाशिकच्या जागेचा समावेश आहे. या जागेवरुन सारेच पक्ष आग्रही असताना दिंडोरीच्या जागेचा मुद्दा काहीसा मागे पडला होता. या मतदारसंघात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उमेदवारी निश्चीत मानली जात. अशावेळी विरोधी पक्षातून शरद पवार गटाने मतदारसंघात ऊमेदवार निश्चित केली आहे. पिंपळगाव बसवंत येथील भास्कर भगरे यांनी तयारीला लागा असे आदेशच खा. पवारांनी दिल्याचे समजते आहे. (Dindori Lok Sabha 2024)

नउ तालुके व सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या दिंडोरीत गेल्यावेळी भाजपाने डॉ. पवार यांना उमेदवारी देत विजयश्री खेचून आणली. अडीच वर्षापूर्वी पवार यांना थेट राज्यमंत्रीपद देत भाजपाने जिल्ह्याचा ७५ वर्षाच्या मंत्रीपदाचा दुष्काळ संपुष्टात आणत मतदारसंघातील कोकणा समाजाला खुष करण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या निवडणूकीत पवार यांनाच निवडणूकीत पुन्हा ऊतरवण्याची खेळी भाजपा करु शकते. अर्थात भाजपाने याबाबत पत्ते ऊघड केलेले नसले तरी यंंदाची निवडणूक भाजपासाठी सोपी नसणार आहे. कारण शरद पवार गटाने भास्कर भगरे यांनाच निवडणूकीच्या आखाड्यात ऊतरविण्याची तयारी केली आहे. कोळी समाजाचे असलेल्या भगरेंनी जिल्हा परिषदेचे सदस्यपद भुषविले आहे. भगरे यांनी मतदारसंघात काही तालूक्यांचे दोनदा दौरे केल्याचे समजते आहे. याबाबत भगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे सुचक वक्तव्य केले. दरम्यान, मोठ्या पवारांनीच दिंडोरीत लक्ष घातल्याने ही निवडणूक चुरशीची ठरु शकते.

भाजपाला करावे लागणार प्रयत्न

दिंडोरी मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात महायुतीचे वर्चस्व आहे. सहापैकी तीन जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत. दोन जागी भाजपा व एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. त्यामुळे सध्यातरी ही जागा महायुतीसाठी सेफ मानली जात आहे. परंतु, गत अडीच वर्षात कांदाप्रश्न, दुष्काळ व मतदारसंघातील प्रश्न कायम राहिल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे महायुतीला विशेष करून भाजपाला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागले.

भाजपा जोखीम पत्करणार का?

दिंडोरी मतदारसंघातील नाराजी बघता मध्यंतरीच्या काळात भाजपाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना मैदानात ऊरविण्याची चर्चा होती. खुद्द झिरवाळ यांनी त्याचा इन्कार केला असला तरी त्यांची मनिषा लपून राहिलेली नाही. दुसरीकडे खा. पवारांचे निष्ठावान समजले जाणारे नेते श्रीराम शेटे यांची भुमिका महत्वपूर्ण असणार आहे. सध्या राष्ट्रवादीच्या काेणत्या गटात राहायचे यावरून त्यांची दोलायमान परिस्थिती आहे. अशावेळी भाजपा ऊमेदवार बदलण्याची जोखीम पत्करणार का हाच खरा प्रश्न आहे.

हेही वाचा :

The post दिंडोरीत रंगणार भाजपा-राष्ट्रवादीत सामना! appeared first on पुढारी.