देशातील पाच लाख गावांमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा

विश्व हिंदू परिषद www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- श्रीक्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्री प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येचा हा सोहळा देशातील पाच लाख गावांसह जगभरातील ६१ देशांमध्ये साजरा होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी मंगळवारी (दि. ९) पत्रकार परिषदेत दिली. प्रभू रामचंद्र यांना विरोध करणाऱ्यांना सत्ता मिळत नाही, असा टोला त्यांनी सोहळ्यावरून राजकारण करणाऱ्या नेत्यांना लगावला.

परांडे म्हणाले, विहिंपने ‘मंदिर वही बनायेंगे’ची घोषणा दिली होती. ती आज सत्यात उतरत असल्याचा अभिमान आहे. पाचशे वर्षांनंतर प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होत असल्याने देशवासीयांसाठी हा क्षण दीपोत्सव आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १५० संप्रदायाच्या साधू-महंतांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले. देशभरातील प्रत्येक घरात अयोध्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येत असून, १५ तारखेपर्यंत २० कोटी घरांपर्यंत हे निमंत्रण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राममंदिर आंदोलनात सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांना २६ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या काळात अयोध्येत दर्शनासाठी निमंत्रण देण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक राज्याला दिवस ठरवून दिल्याचे परांडे म्हणाले. राजकारणाकरीता हिंदू देव-देवतांबद्दल अपशब्द काढणाऱ्या राजकारण्यांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. याप्रसंगी विहिंपचे नाशिक विभागमंत्री अनिल चांदवडकर, जिल्हाध्यक्ष विराज लोमटे आणि शहर महामंत्री योगेश बहाळकर उपस्थित होते.

मंदिर उभारणीत लाखोंची सेवा

राममंदिर सोहळ्याचे निमंत्रण शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना पोहोचले नसल्याकडे लक्ष वेधले असता परांडे म्हणाले, राममंदिरासाठी ५०० वर्षांत लाखो कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आहे. कोणा एकामुळे मंदिर उभे राहिले, असे म्हणता येणार नाही. यावेळी ठाकरेंचे नाव न घेता मंदिर उभारणीसाठी कार्य न करणाऱ्यांनाही निमंत्रण दिले जात असल्याचा टाेला त्यांनी लगावला.

महत्वाचे …

-महाराष्ट्रात २७ हजार गावांमध्ये सोहळा साजरा होणार

-विहिंपचे पुढील लक्ष मंदिरे सरकारी जाेखडातून मुक्त करणे

-गो-हत्या बंदी कायद्यासाठी लढा उभारणार

-धर्मांतरविरोधी कायद्यासाठी पुढाकार घेणार

हेही वाचा :

The post देशातील पाच लाख गावांमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा appeared first on पुढारी.