कर्जदारांना गंडा घालणाऱ्या महिलेच्या कोठडीत तिसऱ्यांदा वाढ

कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तीन लाखापर्यंतचे कर्ज देण्याच्या बहाण्याने कर्जदारांकडून विविध शुल्कच्या नावे हजारो रुपये घेत गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तिसऱ्यांदा वाढ केली आहे. लावण्या पटेल ऊर्फ लतिका खालकर असे संशयिताचे नाव आहे. फसवणुकीची योजना राबविण्यापूर्वी पटेलसह इतर संशयितांनी तेलंगणा राज्यात अनेकदा बैठका घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने लावण्याला बुधवार (दि.१०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दोन ते तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वितरित करण्याचा दावा करीत एका टोळीने पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर येथे श्री बालाजी फायनान्शिअल सर्व्हिसेस नावे कार्यालय सुरू केले. कर्जावर अनुदानदेखील मिळत असल्याचे संशयितांनी आमिष दाखवले. त्यामुळे गरजू नागरिकांनी कर्ज मिळवण्यासाठी कार्यालयात गर्दी केली. त्यांच्याकडून विविध शुल्क आकारणीच्या बहाण्याने १० ते १३ हजार रुपये गोळा केले गेले. तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर नागरिकांना कर्ज वितरित केल्याचे फोटो टाकून नागरिकांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, शुल्क भरूनही कर्ज मिळत नसल्याने नागरिकांनी याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. त्यानुसार शाखेने तपास केला असता हा प्रकार उघड झाला.

पोलिसांनी लतिकाकडून ११ तोळे वजनाचे सोने व रोकड जप्त केली. अटक केलेल्यांपैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्जप्रकरण घोटाळ्याचा कट हैद्राबाद व तेलंगणातील तारांकित हॉटेलमध्ये शिजल्याचे पोलिस तपासात उघड होत आहे. लावण्यासह संशयित कृष्णाराव रेड्डी, माधवन कृष्णन, श्रीनिवासन यांसह एजंट संशयित शफिक शेख, जयश्री गांगुर्डे, भाग्यश्री लिलके, तेजस्विनी अंभोरे, लता हिरे, शीला, अलका लोंवय, परशुराम गावित, अशोक निकम, सलीम खान यांच्यात या हॉटेलमध्ये आर्थिक व्यवहार आणि बैठका झाल्याचे समजते.

लतिकाकडून दिशाभूल

आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या गुन्ह्याचा तपास सुरू असून, संशयित लतिका माहिती देताना पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. पोलिसांनी परराज्यातील पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज व काही नोंदी शोधण्यावर पोलिसांचा भर आहे.

हेही वाचा :

The post कर्जदारांना गंडा घालणाऱ्या महिलेच्या कोठडीत तिसऱ्यांदा वाढ appeared first on पुढारी.