धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

मेणबत्ती कारखाना स्फोट www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात मेणबत्ती तयार करण्याच्या एका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना मंगळवार (दि.18) आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. या स्फोटात चार महिला जागीच ठार झाल्या असून दोन गंभीर भाजलेल्या महिलांना नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळावर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील निजामपूर नजिक वासखेडी शिवारात एका शेतामध्ये मेणबत्ती तयार करण्याचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यात दुपारी दोनच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने शिवारातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मात्र तोपर्यंत या छोट्या कारखान्याला आगीने वेढा घातला होता. या कारखान्यामध्ये जैताणे परिसरातील महिला रोजगारासाठी जात होत्या. या सहा महिला घटनेच्या वेळी कारखान्यात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातील गंभीर भाजलेल्या दोन महिलांना तातडीने नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे तर उर्वरित चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर तहसीलदार आशा गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महीराळे, निजामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी त्वरीत दाखल झाले आहेत. घटना झाल्यानंतर साक्री येथील अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र साक्री ते वासखेडे हे अंतर मोठे असल्यामुळे बंब येण्यास उशीर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरम्यान घटनास्थळावर  मदतकार्य सुरू आहे.

हेही वाचा:

The post धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर appeared first on पुढारी.