नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी

Spelling bee,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भाषिक कौशल्ये विकसित व्हावी, वाचनाची आवड तयार व्हावी, शब्दसंग्रह वाढावा व आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच स्पेलिंग बी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सुटीच्या काळात ६ मे ते १४ जून दरम्यान शालेयस्तरावर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना स्पेलिंग बी स्पर्धेची तयारी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा यांनी विद्यार्थ्यांना केले होते. या अनुषंगाने १९ ते ३० जून दरम्यान स्पेलिंग बी स्पर्धा घेण्यात येत आहे.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याभरापासून विद्यार्थी स्पेलिंग बी स्पर्धेसाठी पाठांतरातून इंग्रजी शब्दसंचय वाढवताय. या स्पर्धेसाठी चार गट तयार करण्यात आले असून, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा एक गट, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचा दुसरा गट, पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा तिसरा गट व इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा चौथा गट करण्यात आला आहे.

सीएसआर निधीचा सहारा

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 30 जून रोजी शहरातील प्रशस्त हॉलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहार, प्रशस्तिपत्रक, पारितोषिक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपन्यांकडून सीएसआर निधी मागविण्यात येणार आहे.

चार स्तरीय स्पर्धा

स्पेलिंग बी स्पर्धेची रचनादेखील चार स्तरांवर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची पहिली स्पर्धा ही शालेय स्तरावर झाली असून, शालेय स्तरावर प्रथम येणारे विद्यार्थी हे केंद्र स्तरावर सहभागी होतील. केंद्रस्तरावर सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम येणारे विद्यार्थी हे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील.

त्र्ययस्थ संस्थेचे सहकार्य

तालुकास्तरावरील स्पर्धेत पारदर्शकता राहावी, यासाठी एज्युकेशन कन्सेप्ट ऑफ इंडिया या त्रयस्थ संस्थेमार्फत तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यातून तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येऊन प्रथम आलेला विद्यार्थी हा जिल्हास्तरावर सहभागी होणार आहे. संस्थेचे रितू मुथा आणि ज्यूड ऑगस्टिन हे काम बघत आहे.

पहिले ते आठवीचे विद्यार्थी

शालेय स्तरावर ९८ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी स्पेलिंग बी स्पर्धेत सहभाग घेतला असून, यामध्ये पहिली दुसरीचे ३१ हजार ८६६, तिसरी व चौथीचे ४१ हजार ९८२, इयत्ता पाचवी ते सहावीच्या १५ हजार १७४ आणि सातवी ते आठवीचे नऊ हजार ४५५ विद्यार्थी आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी appeared first on पुढारी.