नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही

किकवी धरण बाधितांची बैठक,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

किकवी धरणग्रस्तांठी आयोजित बैठकीत अधिकारी खुर्च्यांवर विराजमान झाले खरे, मात्र शेतकरी बांधवांना बसण्यासाठी साध्या सतरंज्यादेखील नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

किकवी धरणाने बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांची बैठक येथील श्री संत जनार्दनस्वामी आश्रमात बोलवण्यात आली होती. 15 वर्षांपासून धरणाचा बासनात गुंडाळलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खासदार गोडसे यांनी पुढाकार घेतला आहे. या धरणाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी पिंप्री, तळवाडे, शिरसगाव, धुमोडी, ब्राह्मणवाडे, पिंपळद, सापगाव यासह पंचक्रोशीतील सुमारे 200 शेतकरी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांचे मत आजमवण्यासाठी जलसंपदा बांधकाम विभागाचे उपअभियंता पांडे आणि इतर अधिकारी आले होते. खासदार गोडसे येणार नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. बैठकीसाठी एक उपअभियंता, एक कनिष्ठ अभियंता आणि कारकून उपस्थित होते. शेतकरी आपले म्हणणे मांडणार कोणापुढे, असा प्रश्न तेथे उपस्थित झाला. तसेच बैठकीच्या जागेवर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मंचावर खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, समोर शेतकरी बांधवांना बसण्यासाठी सतरंजीदेखील नव्हती. बैठकीच्या प्रारंभीच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी आम्ही शेतकऱ्यांनी बसायचे कशावर, असा सवाल केला असता याबाबत समाधानकारक उत्तर कोणीही दिले नाही. यावर सर्व उपस्थित शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत तेथून निघून जाणे पसंत केले. दरम्यान, धरणाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दिनांक १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

किकवी नदीवर 2.4 टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1400 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे. यासाठी जवळपास 912 हेक्टर जमिनीची पाहणी करण्यात आली असून, यामध्ये 172.47 इतकी जमीन वनखात्याच्या अधिपत्त्याखाली आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी 600 कोटी रुपये, तर उर्वरित 800 कोटी रुपये धरणाच्या बांधकामासाठी खर्च केले जातील, अशी प्राथमिक माहिती आहे. 

शेतकऱ्यांची हजारो कोटींची जमीन घेणारी सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांना जमिनीवर बसण्यास सांगत आहे. शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. याबाबत शेतकरी नाराज झाले आहेत. सरकारला शेतकऱ्यांशी संवाद साधायचा असेल तर सन्मानाची वागणूक देण्याची आवश्यकता आहे.

– संपतराव सकाळे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही appeared first on पुढारी.