धुळ्यात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करीत आज धुळे महानगर भारतीय जनता पार्टीच्यावतीने राहुल गांधी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शिरपूर शहर भाजपाने देखील प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला.

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपातून दोन वर्षाची शिक्षा दिली. या घटनेनंतर धुळ्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीने खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले असून त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू केले आहे. धुळे महानगर भारतीय जनता पार्टीने गुरु शिष्य स्मारकापासून खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. शहरातील बाजारपेठेतून काढण्यात आलेली ही अंत्ययात्रा महात्मा गांधी चौकापर्यंत नेण्यात आली. यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले.

महापौर प्रतिभा चौधरी, महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, नगरसेवक हिरामण गवळी, भिकन वराडे आदींनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना अनुप अग्रवाल यांनी राहुल गांधी यांना बेताल वक्तव्याबद्दल कठोर शासन झाले पाहिजे अशी भूमिका मांडली.

शिरपूर येथे जोडे मारो

शिरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा नेत्तृवाखाली करण्यात आले. आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी हे देशाची माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. शहरातील विजयस्तंभा जवळ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

The post धुळ्यात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा appeared first on पुढारी.