नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले

नामको बॅंक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एक लाख ८८ हजार ६३८ इतकी सभासद संख्या असलेल्या दि नासिक मर्चंट्स को-आॅपरेटिव्ह बँक अर्थात नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवार (दि.२९) हा अर्ज दाखल करण्याचा वार ठरला. मंगळवारपर्यंत अवघे सात उमेदवारी अर्ज दाखल असताना बुधवारी हा आकडा थेट ११४ वर पोहोचला. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पॅनलच्या सभासदांनी शक्तिप्रदर्शन करीत, आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारपर्यंत ५७ सभासदांना ११३ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

व्यापारीवर्गाचे वर्चस्व असलेल्या नामको बँकेचे जाळे जिल्ह्यासह परराज्यात विस्तारले आहे. २०१४ ते २०१९ या प्रशासकीय काळानंतर झालेल्या बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलने २१/० अशा फरकाने विजय मिळवित विरोधी पॅनलचा धुव्वा उडवून दिला होता. अशात २०२३-२४ ते २०२८-२९ या काळासाठी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधी पॅनल समोरोसमोर येतील की, बिनविरोधसाठी प्रयत्न केले जातील असा अंदाज सुरुवातीला बांधला जात होता. मात्र, बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पॅनलने केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे बिनविरोधची आशा धुसर झाली असून, निवडणुकीचा बार उडविला जाण्याची शक्यता बळावली आहे. कारण दोन्ही गटाच्या इच्छुकांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचे दिसून आल्याने, यंदाची निवडणूकदेखील चुरशीची होण्याची शक्यता आहे. तीन पॅनल मैदानात उतरविण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे.

दरम्यान, बॅंकेच्या सर्वसाधारण गटासाठी १८ जागा, अनुसूचित जाती-जमातीकरिता एक, तर महिलांसाठी दोन राखीव जागा अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. २४ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली असून, बुधवारी एकूण ११४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वसाधारण मतदारसंघात ८७, महिला राखीव मतदारसंघात १६ तर अनुसूचित जाती-जमातीतून ३ असे आज एकूण १०६ तर मंगळवारी ०८ अर्ज दाखल झाले होते. ६ ते ११ डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज माघारीसाठी वेळ देण्यात आला आहे. २४ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ , या वेळेत मतदान घेण्यात येणार असून, मतमोजणी २५ डिसेंबरला होणार आहे.

अर्ज भरताना ‘हम साथ-साथ है’

गेल्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलविरोधात मैदानात उतरलेल्या ललित मोदी व महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत सत्ताधारी प्रगती पॅनलचे नेते माजी आमदार वसंत गिते, सोहनलाल भंडारी, अजय ब्रह्मेचा, विजय साने, हेमंत धात्रक आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मोदी आणि मंडलेचा यांनी सत्ताधारी पॅनलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अर्ज भरल्याने सभासदांना ‘हम साथ-साथ है’ या गाण्याची आठवण झाली नसेल तरच नवल.

माहेश्वरी समाजाचा पाठिंबा

नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेने नामको बँकेच्या सत्ताधारी प्रगती पॅनलला पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पॅनलकडूनदेखील सभासदांचे मन वळविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असून, प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला जात आहे.

The post नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले appeared first on पुढारी.