सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे

दादा भुसे, सुधाकर बडगुजर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाउद इब्राहिम याचा राइट हॅन्ड असलेल्या सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पार्टी देतात. त्या पार्टीमधील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बडगुजरांचे हे कृत्य देशद्रोही आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. सलीम कुत्ताचे निधन झाले, असे म्हणणाऱ्यांची कीव येते, असा टोलाही भुसे यांनी लगावला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.२२) पत्रकारांशी संवाद साधला. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात २५७ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. ७०० नागरिक जखमी झाले होते. दाऊद इब्राहिमचा राइट हॅन्ड सलीम कुत्ताच्या माध्यमातून हे बाॅम्बस्फोट घडवून आणण्यात आले. टाडा न्यायालयाने कुत्ताला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याच कुत्ताच्या सन्मानार्थ बडगुजर हे पार्टी देतात. पार्टीमध्ये ‘अरे दिवानो मुझे पहचानो मै हु डॉन’ या गाण्यावर डान्स करतात, ही अतिशय गंभीर बाब आहे. एकप्रकारे हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असून, बडगुजरांच्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही, असे भुसे म्हणाले.

सलीम कुत्ता सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. तरी काही लोक हे कुत्ताचे निधन झाल्याचे सांगत तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा व्यक्तींच्या बुद्धीची आपल्याला कीव करावीशी वाटते. तसेच कुत्ताचे निधन झाल्याचे सांगत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हेदेखील एक प्रकारचे देशद्रोही कृत्य असल्याची प्रतिक्रिया भुसे यांनी नोंदवली.

दरम्यान, भाजप नेत्यांचे दाऊद यांच्या नातेवाइकांच्या लग्नातील व्हायरल छायाचित्राबद्दल भुसे यांचे लक्ष वेधले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, शेरे खतीब यांच्या घरातील लग्नाला पदाधिकारी गेले होते. याबद्दल सर्व नाशिककरांना माहिती आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी संपूर्ण देशभरात निवडणूक लढवावी, असा टाेला भुसे यांनी लगावला.

आरक्षणाला धक्का नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे यापूर्वीच सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन अपेक्षित काम करत असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले. कांदा व इथेनॉलसंदर्भात राज्यातील वरिष्ठ नेते हे दिल्लीशी संवाद साधणार आहे. अधिवेशनामुळे थोडेफार मागे पुढे झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे appeared first on पुढारी.