बडगुजरांच्या पार्टीत भाजप कार्यकर्त्याचाही डान्स

सुधाकर बडगुजर पार्टी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत एका पार्टीत डान्स केल्याचा शिवसेना उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या पार्टीचे धागेदोरे शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात असून, या पार्टीत भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे याचाही समावेश असल्याचे आता समोर येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेला सलीम कुत्ता पॅराेलवर असताना सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या पार्टीत सहभागी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जात असून, नाशिक पोलिसांकडूनदेखील कसून तपास केला जात आहे. पार्टीतील या व्हिडिओमध्ये दिसून येत असलेल्या बहुतेकांची चौकशी आतापर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, व्हिडिओमध्ये नाचताना दिसत असलेल्या बडगुजर यांच्या पाठीमागेच भाजपचा व्यंकटेश मोरे ऊर्फ व्यंक्या मोरे हादेखील नाचताना दिसून येत असल्याने, पोलिसांकडून त्याचीदेखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. व्यंकटेश मोरे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर आतापर्यंत अनेक गंंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे यांंनीदेखील आरोपांची राळ उठवून दिली आहे. आता भाजप पदाधिकाऱ्याचाही पार्टीत सहभाग असल्याचे समोर आल्याने, विरोधी गटाकडूनदेखील आरोप केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post बडगुजरांच्या पार्टीत भाजप कार्यकर्त्याचाही डान्स appeared first on पुढारी.