नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता?

नारायण राणे, सुधाकर बडगुजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर थेट राणे यांच्या अटकेसाठी शहर पोलिस पथक राणेंच्या अटकेपोटी कोकणात रवाना झाले होते. बडगुजर यांच्यापाठोपाठ राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले होते. राणे यांना तेव्हा अडचणीत आणणाऱ्या बडगुजर यांच्याविरोधात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत पुराव्यानिशी आरोप करून आ. नितेश राणे यांनी हिशेब चुकता केल्याची यानिमित्त चर्चा होत आहे. Sudhakar Badgujar Salim Kutta Connection)

सुमारे सव्वादोन वर्षांपूर्वी कोकणात काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी राणे यांच्याविरोधात सुधाकर बडगुजर यांनी नाशिक सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. समाजात तेढ निर्माण करणे, दमबाजी आदी कलमांनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रामप्रहरी नाशिक शहर पोलिसांचे पथक पुणेमार्गे रत्नागिरीत पोहोचले होते. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली होती. पुढील नाट्यांकात राणे यांना अटक होऊन लगेचच जामीन मंजूर झाला. तथापि, आता बडगुजर यांच्याविरोधात पुरावे प्राप्त होताच आ. नितेश राणे यांनी विधानसभेत छायाचित्रासह व्हिडिओ जारी करीत बडगुजर यांना अडचणीत आणून मागचा हिशेब चुकता केल्याचे बोलले जात आहे. (Sudhakar Badgujar Salim Kutta Connection)

काय आहे आरोप? (Sudhakar Badgujar Salim Kutta Connection )

आ. नितेश राणे यांनी सभागृहात एक छायाचित्र दर्शवून सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले. या छायाचित्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचे दिसत आहे. सलीम कुत्ता हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. कुत्ता हा पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केल्याचा आरोप आ. राणे यांनी केला. राणे यांनी यासंबंधीचा व्हिडिओ सादर करीत पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून सर्वत्र खळबळ माजवून दिली. त्यांच्या सुरात सूर मिळवत मंत्री दादा भुसे यांनी, बडगुजर हा तर छोटा मासा आहे, या प्रकरणातील बड्या माशाचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी केली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा :

The post नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून हिशेब चुकता? appeared first on पुढारी.