नाशिकच्या गोदावरी नदीत शेकडो माशांचा तडफडून मृत्यू

गोदावरी नदी नाशिक,www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव येथील गोदावरीच्या पात्रात माशांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येदेखील गोदापात्रात शेकडो माशे तडफडून मृत पावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे गोदापात्रातील वाढते प्रदूषण जलचर प्राण्यांसाठी जीवघेणे ठरत असून, गोदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी कोपरगाव येथे गोदावरीच्या पात्रात हजारो मासे मृत पावल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच नाशिकमधील संत गाडगेबाबा पुलाखालील गाेदावरी पात्रातही शेकडो मासे तडफडून मृत झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून गोदामाई प्रतिष्ठान हे गोदावरीच्या संरक्षणासाठी झटत आहे. या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, उपाध्यक्ष तथा सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर तसेच संकेत शिंदे व त्यांची टीम नुकतीच पंचवटी येथील गाडगेबाबा पुलाजवळ स्वच्छता अभियानासाठी गेली असता त्यांना गोदापात्रात बरेच मासे मृतावस्थेत आढळून आले. गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणाने माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे या संस्थेच्या पाहणीतून समोर आले. वारंवार सामाजिक कार्यातून जनतेला आवाहन करूनदेखील गोदावरीच्या पात्रात प्रदूषण करणे आजवर थांबलेले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

 मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, मनपा बेदखल

गोदामाई प्रतिष्ठानने ही बाब थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन देत कळविली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेत यासंदर्भात प्रतिष्ठानच्या ईमेलला उत्तर दिले असून, मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अद्यापही मनपाकडून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

नागरिकांना दूषित पाणीपुरवठा

गोदमाईचे पाणी दूषित झाले असून, त्यामुळे माशांना हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे या ठिकाणी गेल्‍या काही दिवसांपासून मासे मरत आहेत. तर मेलेल्या माशांपासून व दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या भागात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे गोदावरीच्या पाण्याचा पुरवठा नाशिक शहरासह अनेक तालुक्यांना, गावांना केला जात आहे.

दूषित पाण्याचा बंदोबस्‍त करावा

गेल्‍या काही दिवसांपासून चाललेली ही माशांच्या मरणाची शृंखला आजही सुरूच आहे. आजही हजारो मासे पाण्यावर तरंगत जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे पाणी कोणत्या कारखाना किंवा इतर कशामुळे दूषित झाले आहे, हे संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी तपासावे. यावर बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे.

गोदाप्रदूषणाबाबत तात्पुरती कार्यवाही न करता मनपा प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नदीपात्रात सोडलेल्या गटारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. रिव्हर आणि सिव्हर स्वतंत्र झाले पाहीजे. आजघडीला गोदापात्रामध्ये माशांसह अनेक जलचर प्राणी मृत होत असून, आताच दखल घेतली नाही तर याचे दुष्परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहे. याचाही मनपा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.

– चिन्मय उदगीरकर, अभिनेता तथा उपाध्यक्ष, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट

हेही वाचा : 

The post नाशिकच्या गोदावरी नदीत शेकडो माशांचा तडफडून मृत्यू appeared first on पुढारी.