नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निसर्गाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना सरकारतर्फे मदत मिळते. राज्यव्यापी विचार केल्यास साधारणतः दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची जास्त मदत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने केली आहे. ही मदत व अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले असून काही ठिकाणी प्रक्रिया सुरु आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या ॲपमध्ये समस्या आल्याने हा विषय लांबला असला तरी येत्या आठ ते दहा दिवसांत ही समस्या सोडवून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग होतील, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

ठक्कर डोम येथे आयोजित कृषिथॉन प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ना. भुसे बोलत होते. ते म्हणाले, जे शेतकरी नियमीत कर्ज फेड करतात त्यांना ५० हजार रुपयापर्यंतचा अनुदान देण्याचा निर्णय असून त्याअंतर्गत आतापर्यंत पहिल्या टप्प्यात अडीच ते तीन हजार कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही रक्कम मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान, नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून महाराष्ट्र असल्याचे मत ना. दादा. भुसे यांनी व्यक्त केले आहे.

त्याचप्रमाणे पंतप्रधान पीक वीमा योजनेमध्ये पूर्वी साडेतीनशे पट जोखीम गृहीत धरून पीक विमा डिझाईन केली जायची. मात्र आता चालू वर्षापासून पिक विमा योजना राबवण्यास घेतली आहे ती बीड पॅटर्न नुसार आहे. यात कंपन्यांना नफा झाला तर फक्त दहा टक्के त्यांना नफा मिळेल आणि जास्त नुकसान झाला तर फक्त दहा टक्के नुकसानीची जबाबदारी पिक विमा कंपन्यांवर आहे. हे मॉडेल याआधी फक्त बीड जिल्ह्यापुरते राबवण्यात आले होते. चालू वर्षापासून संपूर्ण राज्यासाठी या मॉडेल प्रमाणेच अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे यापूर्वी पिक विमा कंपन्यांच्या घशामध्ये जो पैसा जायचा तो पैसा नुकसान झालं तर राज्य सरकार त्याची जबाबदारी स्वीकारेल आणि शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. जर पैसा वाचला तो सरकारकडे जमा होईल आणि तो शेतकऱ्यांच्या विकासासाठी खर्च केला जाईल असेही ना. भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे appeared first on पुढारी.