नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी

लायब्ररी ऑन व्हील www.pudhari.news

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाची ‘लायब्ररी ऑन व्हील’ ही योजना सुरु झाली आहे. या योजनेतून शहराच्या विविध विभागात वेगवेगळ्या दिवशी सभासदांना हवी असलेली पुस्तके बदलून मिळणार आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि हृदयरोगतज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते ‘लायब्ररी ऑन व्हील’ या उपक्रमाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

लायब्ररी ऑन व्हीलचे उद्घाटक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की, लहानपणापासून मला वाचनाची आवड असल्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. पुस्तकांमुळे आयुष्यात कठीण बाबीही सोप्या होतात. मानसिक बळ प्राप्त होते तसेच स्पर्धा परीक्षा सोडविण्यास आत्मविश्वास प्राप्त होतो. अलिकडेच वाचण्यात आलेले ‘लेगसी ऑफ शिवाजी’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे. यामुळे मुलांना मराठी योध्यांचा इतिहास समजण्यास मदत होणार आहे. वाचनाचा लाभ जास्तील जास्त वाचकांनी घ्यावा असे सांगितले.

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी म्हणाले की, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ‘लायब्ररी ऑन व्हील’ ही योजना पूर्ण झाल्याने सावानाच्या सभासद वाचकांची अपेक्षा पूर्ण होणार आहे. विशेषत: ज्येष्ठ सभासदांसाठी महत्त्वाच्या चौकामध्ये हे वाहन उभे राहील आणि लोकांनी तेथे येऊन पुस्तके बदलता येतील अशी योजना ही आहे. त्यामुळे सावानात येण्याची पायपीट वाचणार आहे. ही योजना सावानामार्फत शाळांमध्येही रावबविण्यात यावी, जेणेकरून त्यातूनही अनेक तरूण वाचक तयार होऊन, भावी अधिकारी निर्माण होतील.

सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी मनोगत व्यक्त करून भावी योजनांबद्दल माहिती दिली. लायब्ररी ऑन व्हील या योजनेस वाचक सभासद आणि नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविकात प्रमुख सचिव देवदत्त जोशी यांनी लायब्ररी ऑन व्हीलची माहिती देऊन, ही योजना प्रलंबित होती, मात्र वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने लायब्ररी ऑन व्हील ही योजना युध्दपातळीवर काम करून तांत्रिक अडचणी दूर करून ही योजना सुरु करण्यासाठी नाशिककरांनी, तसेच सार्वजनिक वाचनालयाच्या सगळ्या कार्यकारी मंडळाने व सावनाच्या सेवक वृदाने भरघोस अशी मदत केली. दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर लायब्ररी ऑन व्हील ही योजना सुरु झाली असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याचा परिचय जयेश बर्वे व संजय करंजकर यांनी करून दिला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा सत्कार वाचनालयाचे कार्याध्यक्ष ॲड.अभिजित बगदे यांचे हस्ते तर डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सावानाचे जेष्ठ कर्मचारी संजय रत्नपारखी व वाहनाचे चालक वैभव देसाई यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन अर्थ सचिव गिरीश नातू यांनी केले. आभार प्रदर्शन वैद्य विक्रांत जाधव यांनी केले.

यावेळी प्रमुख सचिव, डॉ.धर्माजी बोडके, प्रेरणा बेळे, सुरेश गायधनी, उदयकुमार मुंगी, मंगेश मालपाठक, प्रा. सोमनाथ मुठाळ, प्रशांत जुन्नरे, माजी अध्यक्ष नाना बोरस्ते, नरेश महाजन, धनंजय बेळे, डॉ.यशवंत पाटील, भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेद्र पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजित सोनवणे, दिलीप आहिरे, मुक्तेश्वर मूनशेटीवार, सुहास भणगे, विजय लोंढे, प्रशांत कापसे, प्रकाश कोल्हे, सुरेश राका, नाना काळे, प्रकाश वैद्य, गोसावी तसेच वाचक सभासद, पानसे अभ्यासिका विद्यार्थी आणि सावाना सेवकवृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये आता पुस्तके वाचकांच्या दारी appeared first on पुढारी.