नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी (दि.२९) साजऱ्या होत असलेल्या शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध विठ्ठल-रुख्मिणी मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, भाविकांकडून दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त व नियोजन केले आहे.

मंदिरांची नगरी असलेल्या नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह काही औरच असतो. विशेषत: पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात असल्याने, शहरातील मंदिरांमध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. आदल्या दिवशी विविध शाळांमध्येदेखील पारंपरिक पद्धतीने साजरी करत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत शाळेत हजेरी लावल्याने आषाढी उत्साहात साजरी केली जात आहे. त्यामुळे एक दिवस अगोदरच आषाढीचा आनंद शहर व परिसरात बघावयास मिळत आहे. दरम्यान, गुरुवारी (दि.२९) विविध मंडळांतर्फे फराळ वाटपांसह अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष नियोजन केले आहे. कॉलेजरोड परिसरातील विठ्ठलाच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे आषाढीचा उत्साह द्विगुणित झालेला दिसून येतो. यंदाही याठिकाणी भाविकांकडून मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आषाढीनिमित्त पंढरपूरला नाशिकहून मोठ्या प्रमाणात भाविक गेले आहेत.

फराळाची रेलचेल

आषाढी एकादशीनिमित्त अनेकांचे उपवास असल्याने, घरोघरी फराळाचे पदार्थ बनविले जातात. त्याचबरोबर रेडीमेड पदार्थांनादेखील मोठी मागणी असते. दरम्यान, बुधवारी (दि.२८) उपवासाचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी फळांनाही मोठी मागणी असल्याचे दिसून आले.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह appeared first on पुढारी.