नाशिकमध्ये सिटीलिंक वाहकांचे पुन्हा आंदोलन, प्रवाशांचे हाल

सिटीलिंक वाहकांचे पुन्हा आंदोलन,www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयांनी तोट्यात असलेली शहर बससेवा मोठा गाजावाजा करीत सुरू केली होती. मात्र, सिटी लिंक बस ठेकेदार हा वाहकांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर दोन – चार  महिन्यात कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे. आता पुन्हा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे व दोन वर्षाचा दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे बुधवार (दि. २२) पहाटे पासून सिटीलिंकच्या एकुण ४०० वाहकांनी संप पुकारत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे तपोवन बस डेपोतून व नाशिक रोड बस डेपोतून एकही बस बाहेर निघालेली नाही.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेली महापालिकेची बससेवा सुरू केली. मात्र, थकित वेतनासाठी ठेकेदार मार्फत सुरू असलेली सिटीलिंक बस सेवा वर्षातुन अनेकदा ठप्प  होते. अन् प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे आपली राज्य परिवहन महामंडळाची सेवाच बरी अशी भावना व्यक्त करण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नसल्यामुळे पुन्हा एकदा कामबंद आंदोलन पुकारले आहे. पहाटेपासून तपोवन डेपोतुन एकही बस बाहेर पडली नाही. या आंदोलनात जवळपास ४०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.

श्री शिव महा पुराण कथेसाठी बस काढण्याची ठेकेदाराची विनंती

तपोवन डेपोतील १५० तर नाशिक रोड डेपोतील ९० बस वाहतूक सेवा सकाळ पासून ठप्प झाली आहे. एकुण ४०० वाहकांनी संप पुकारला आहे. काही वाहकांना गेला ३ महिन्यापासून पगार मिळालेला नाही,  तर दोन वर्षाचा दिवाळी बोनस देखील अद्याप मिळालेला नाही. ठेकेदाराला याबाबत अनेकदा कळविण्यात आले. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. तसेच वाहकांची साप्ताहिक सुट्टी सोबतच अत्यावश्यक सुट्ट्या देखील बंद करण्यात आलेल्या आहे. तुर्त कमीत कमी महाशिवपुराण कथेसाठी लागणाऱ्या बस काढण्याची विनंती ठेकेदार वाहकांना करत आहे. मात्र वाहक आपल्या मागण्यांवर ठाम आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये सिटीलिंक वाहकांचे पुन्हा आंदोलन, प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.