शेती उद्योगाच्या दर्जासाठी शासन प्रयत्नशील : राज्यपाल रमेश बैस

Nashik News राज्यपाल रमेश बैस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असून, मी स्वत: शेतकरीपुत्र आहे. त्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे आलो आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव-शिरसाठे गावात मंगळवारी (दि.२१) ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत कृषी विभागामार्फत ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषिविकास अधिकारी कैलास शिरसाट, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित हाेते.

राज्यपाल बैस यांनी शिरसाटे गावातील शेतकरी भास्कर मते व राजेंद्र केदार यांच्याशी संवाद साधत सेंद्रिय शेती व उत्पादन, शेतीमधील समस्या, वीज व पाणीसमस्या, पीकपध्दती आदींबाबत मुक्त संवाद साधला. तसेच शेतीमधील अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी गावातील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र केदार यांच्या शेतातील टोमॅटो पिकावर ड्रोनव्दारे नॅनो युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक राज्यपालांपुढे सादर करण्यात आले. यावेळी इफ्कोचे क्षेत्र अधिकारी निमिश पवार, मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षण सहयोगी हेमराज राजपूत यांनी नॅनो युरिया फवारणीबाबतची तांत्रिक माहिती व फायदे विशद केले.

विद्यार्थ्यांना सायकल वाटप

मोडाळे गावामधील ज्ञानदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामधील विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते मानव विकास मिशनअंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समाधान भुरबुडे, उमेश सराई, सोमनाथ सराई, गोरख सराई व सागर सराई या विद्यार्थ्यांना सायकलाचा लाभ मिळाला.

हेही वाचा :

The post शेती उद्योगाच्या दर्जासाठी शासन प्रयत्नशील : राज्यपाल रमेश बैस appeared first on पुढारी.