नाशिक : अक्षय्य तृतीयेनिमित्ताने खरेदीसाठी गर्दी; बाजार फुलला

अक्षय तृतीया,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया शनिवारी (दि.२१) साजरी करण्यात येणार असून, त्याच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली. करा-केळी तसेच पूजेचे साहित्य घेण्यासाठी नाशिककरांची लगबग उडाली.

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून साजरी करण्यात येते. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. यादिवशी प्रारंभ केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही, अशी मान्यता आहे. यादिवशी वस्तू दानाला अधिक महत्त्व आहे. पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. तसेच आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदीला राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी याच दिवशी पृथ्वीवर पाठवले. तर देवी अन्नपूर्णा आणि महात्मा बसवेश्वर, भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. त्यामुळे या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, अशोकस्तंभ, सराफ बाजार, शालिमार येथे विक्रेत्यांनी करा-केळीची दुकाने थाटली. तर पूजनासाठी आवश्यक साहित्य तसेच नैवेद्यासाठी लागणारे आंबेही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात आले. नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी परिसर, इंदिरानगर व अन्य उपनगरांमध्येही अक्षय्यतृतीयेची लगबग पाहायला मिळाली.

पूजेसाठीचा मुहूर्त

अक्षय्यतृतीयेला पूजनासाठी सकाळी ७ वाजून ४९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २० मिनिटे असा मुहूर्त असल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे.

आंब्याने खाल्ला भाव

अक्षय्य तृतीयेनिमित्ताने शहरामध्ये कोकण हापूस, कर्नाटक हापूस, लालबाग, केशर यासह विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले. नाशिककरांना एक डझन आंब्यांसाठी १०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत पैसे माेजावे लागले. तसेच करा-केळीचे दर ८० ते १४० रुपये दरम्यान होते.

सोने-चांदीच्या दराकडे लक्ष

सोन्याचे भाव सार्वकालिक उच्चांकावर गेले आहेत. त्यामुळे उद्याच्या (दि. २२) अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने-चांदीचा दर काय असेल याकडे लक्ष लागून आहे. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति दहा ग्रॅमसाठी सोन्याचा दर ५६ हजारांपेक्षा अधिक नोंदविला गेला. तर २४ कॅरेट प्रति दहा ग्रॅमसाठी सोने ६१ हजारांच्यावर असल्याचे नोंदविले गेले. चांदीला देखील १ किलोसाठी ७७ हजार ६०० रुपये भाव नोंदविला गेला. हाच दर कायम राहिल्यास सोने-चांदी खरेदीवर किंचित परिणाम होईल, अशी भिती सोने व्यवहारातील विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोन्याचे दर वाढले तरी सर्वसामान्यांमधील त्याचे आकर्षण अद्यापही कमी झालेले नाही. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने, यादिवशी मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : अक्षय्य तृतीयेनिमित्ताने खरेदीसाठी गर्दी; बाजार फुलला appeared first on पुढारी.