Nashik Crime : कोष्टी गोळीबार प्रकरणी सात संशयित ताब्यात

कोष्टी गोेळीबार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सराईत गुन्हेगार तथा भाजप माथाडी कामगार आघाडीचा पदाधिकारी राकेश काेष्टी गाेळीबार प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मध्य प्रदेशातून सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात मुख्य सूत्रधार किरण शेळकेचा समावेश आहे. मात्र, गाेळी झाडणारा सागर पवार अद्यापही फरार आहे. त्यामुळे या गोळीबार कांडातील संशयितांची संख्या १३ वर पोहोचली असून, ११ संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. अकराही संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

गेल्या आठवड्यात सिडकोतील बाजीप्रभू चौकात राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. घटनेच्या दिवशीच संशयित सराईत जया दिवे व विकी ठाकूर यांना, तर दुसऱ्या दिवशी पंचवटीतील नवनाथ नगरमधून गाैरव गांगुर्डे आणि म्हसरूळ येथून किरण क्षीरसागरला अटक झाली हाेती. उर्वरित संशयित फरार झाले होते. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. गुन्हेशाखा युनिट एककडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता.

वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना कोष्टी गोळीबार प्रकरणातील संशयित मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील बडवाह येथे असल्याची माहिती कळाली. त्याआधारे पथकाने सतत तीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन तपासाचे कौशल्य वापरून ७ संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक ढमाळ, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीमखान पठाण, संदीप भांड, शरद सोनवणे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, महेश साळुंखे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

१८ तास रचला सापळा

गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने अठरा तास सापळा रचूून संशयित किरण शेळके, सचिन लेवे, (पंचवटी), किशोर वाकोडे (कथडा), राहुल गुप्ता (पंचवटी), अविनाश रणदिवे (सातपूर), श्रीजय ऊर्फ गौरव खाडे, (जुना आडगाव नाका), जनार्दन बोडके (पंचवटी) यांना अटक केली. त्यांच्याकडून गाेळीबारादरम्यान पळून जाण्यासाठी वापरलेली स्क्वाॅडा ऑक्टिव्हिया कार (एमएच ४३ व्ही ४६६९), एक चाॅपर व चाकू जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Crime : कोष्टी गोळीबार प्रकरणी सात संशयित ताब्यात appeared first on पुढारी.