नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान

कांदा दरात तेजी,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्याला गारपीट व वादळी पावसाने झोडपल्याने कांदा आगारात कांद्यासह शेतातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या लाल-रांगडा कांद्याचे कालच्या गारपीटीने मोठे नुकसान झाल्याने आगामी काळात कांद्याची टंचाई होणार आहे. त्यामुळे आज कांद्याच्या भावाने अचानक मोठी उसळी घेतली. येथील उन्हाळ कांदा कमाल दर १६९० रुपये प्रति क्विंटलने वाढले तर लाल कांदा दरात (Nashik Onion Price) ७०० रुपयांची वाढ झाली.

नाशिक जिल्ह्याबरोबर धुळे, नगर, पुणे या कांदा उत्पादन घेणाऱ्या परिसरातही पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातही लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे लाल कांद्याची आवक घटणार आहे. कांदा उत्पादक तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने आज सकाळी लासलगाव बाजार समितीत रविवारच्या सुटीनंतर सुरू झालेल्या कांदा लिलावात अगदी नगण्य आवक झाली. शनिवारच्या तुलनेत बाजारभाव (Nashik Onion Price) ७०० ते १७०० रुपयांनी वधारल्याचे चित्र आहे.

माल खराब झाला

निफाड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी संदीप दरेकर यांचे रविवारच्या पावसाने सर्वाधिक नुकसान हे लाल कांद्याचे झाले आहे. अनेक शेतकऱयांनी कांदा काढून शेतातच ठेवला होता, तर अनेक शेतकऱ्यांकडील लाल कांदा लवकरच काढणीवर येणार होता. मात्र गारपीटीमुळे आता हा सर्व कांदा खराब झाला आहे.

कांदा भाव खाणार

गेल्या आठवड्यापासून लासलगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील लाल कांद्याची आवक वाढत होती. त्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचे दर घसरु लागले होते. बाजार समित्यांमधील उन्हाळी कांद्याची आवक घटून लाल कांद्याची आवक वाढत होती. मात्र कालच्या पावसाने आता लाल कांद्याचीही आवक घटणार आहे. ज्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे, अशा शेतकऱ्यांकडील जो काही अल्प उन्हाळी कांदा शिल्लक आहे, तोही पावसाळी वातावरण आणि ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे. काही कांदा खराबही झालेला आहे. त्यामुळे सोमवारी दोन्ही प्रकारच्या कांद्याचे दर वाढले आहेत.

लासलगाव बाजारसमितीतील दर (Nashik Onion Price)

उन्हाळ कांदा: किमान ३१००,कमाल ५२३१, सरासरी ४५०० रुपये

लाल कांदा: किमान २०००, कमाल ४७०१, सरासरी ४२०० रुपये

हेही वाचा :

The post नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान appeared first on पुढारी.