नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

केदा आहेर www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता यांनी राज्यातील सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांना कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक निर्णयाचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी स्वागत केले. त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

ग्रामीण भागात कांदा लागवडी बरोबरच इतर कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यात वीज वितरण कंपनीने कृषी पंप ग्राहकांकडे वीज वसुलीचा धडाका सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, ते आर्थिक संकटात सापडले आहेत. वीज वितरण कंपनीने याची दखल घेऊन कृषी पंप ग्राहकांचा वीजपुरवठा चालू बिल किंवा थकबाकी वसुलीकरीता तसेच इतर कोणत्याही कारणास्तव पुढील आदेशापर्यंत खंडित केला जाणार नाही , असा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि तत्काळ प्रभावाने करण्यात यावी, असे निर्देश दिल्याने  शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी कृषीपंप धारकांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी वीज वितरण कंपनीकडे केली होती. वीज वितरण कंपनीने याची दखल घेऊन वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय घेतल्याने आहेर यांनी समाधान व्यक्त केले असून, शेतकरी वर्गात या सकारात्मक निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.