नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खिडकीतून हात घालून चोरी करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गजाआड केले आहे. विजय तुकाराम वाघमारे (४७), सागर संजय गरुड (२४, दोघे रा. दत्तनगर, अंबड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
जेलरोड परिसरातील भाऊसाहेब आहेर यांच्या घरात २३ फेब्रुवारीला चोरट्याने चोरी करून १६ हजार ५०० रुपये व मोबाइल लंपास केला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे अंमलदार राहुल पालखेडे यांना चोरट्यांची माहिती मिळाली. चोरलेले मोबाइल विक्रीसाठी सिडकोतील कामटवाडे परिसरात संशयित येत असल्याचे समजल्यानंतर पथकाने सापळा रचला. पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाईक विशाल काठे, प्रशांत मरकड, अंमलदार पालखेडे, मुख्तार शेख, राजेश राठोड यांच्या पथकाने बुधवारी (दि.३१) संशयित विजय व सागर या दोघांना पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून चोरीचे चार मोबाइल आढळून आले.
सखोल चौकशीत पुन्हा १२ मोबाइल आढळले. त्यानुसार पथकाने दोघांकडून ९७ हजार रुपयांचे १६ मोबाइल जप्त केले असून, उपनगर पोलिस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. मात्र, संशयितांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा :
- नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई
- Nashik : निफाडमधील मुलीचे अपहरण लव्ह जिहादचाच प्रकार : किरीट सोमय्या
- Foxconn लवकरच कर्नाटकात आयफोन्सचे उत्पादन सुरु करणार, ५० हजार नोकऱ्यांची संधी
The post नाशिक : खिडकीतून हात घालून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पकडले appeared first on पुढारी.