नाशिक : गांधी तलावातील नौकाविहार पुन्हा सुरू होणार

गांधी तलाव नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गोदावरीतील गांधी तलावात (Nashik Gandhi Talav) नाशिककर तसेच पर्यटकांना पुन्हा एकदा नौकाविहाराचा आनंद लुटता येणार आहे. कोरोना काळामध्ये या तलावात बोटी चालविण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर गेली दोन वर्षे नौकानयन बंद होते. आता लिलाव प्रक्रियेअंती नौकाविहाराचा पाच वर्षांचा ठेका देण्यात आला असून, महापालिकेला दरवर्षी १.८४ लाखांचा महसूल मिळणार आहे.

पंचवटीत अहिल्यादेवी होळकर पूल ते रामकुंडादरम्यान महापालिकेने पर्यटनासाठी गांधी तलाव (Nashik Gandhi Talav) विकसित केला आहे. या तलावात नौकानयनासाठी दरवर्षी जाहीर लिलाव प्रक्रियेद्वारे ठेका दिला जातो. पंचवटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गांधी तलावामध्ये नौकानयनाकरिता परवानगी देण्यात येते. कोरोनाकाळात नौकानयनाला बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून गांधी तलावातील नौकानयन बंद होते. महापालिकेने नौकानयन पुन्हा सुरू करण्यासाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया राबवली. यात सर्वाधिक बोली देणाऱ्यास पाच वर्षे मुदतीचा ठेका देण्यात आला आहे. बोटींसाठीचे तिकीट दर महापालिकेने निश्चित केले आहेत. त्यानुसार रोइक बोट व पेडल बोटीकरिता १२ वर्षांवरील तिकीटदर प्रतिमाणशी ४० रुपये, तर १२ वर्षांच्या आतील मुलांसाठी तिकीटदर ३० रुपये असणार आहे. मोटार बोट, वॉटर स्कूटरही गांधी तलावात चालणार असून, यासाठी १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी तिकीटदर प्रत्येकी ५० रुपये, तर १२ वर्षांआतील मुलांसाठी तिकीटदर प्रत्येकी ४० रुपये आकारले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : गांधी तलावातील नौकाविहार पुन्हा सुरू होणार appeared first on पुढारी.