नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध

जायकवाडी धरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असून ही आकडेवारीच फसवी असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शविला. लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेत मेरी संस्थेद्वारे दोन दिवसांमध्ये धरणांमधील उपलब्ध साठ्याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.६) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या आकस्मिक पाणी आरक्षण बैठकीत जायकवाडी पाण्याचा मुद्दा चर्चेला आला. पाटबंधारे विभागाकडून सादर केली जाणारी माहिती खोटी व फसवी आहे. आरक्षणाशी संबंध नाही, अशा संस्थांची नावे यादीत घसवुन आकडेवारीचा फुगवटा केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच गंगापूर व दारणा समुहात मुळात पाणीसाठा कमी असताना जायकवाडीला ३.१४० टीमएसी पाणी देण्याचा प्रश्न येत नसल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी लावुन धरला.

आमदार देवयांनी फरांदे यांनी गंगापूर धरण समुहात सध्याचा उपलब्ध पाणीसाठा नाशिक महापालिकेची ६ हजार १०० दलघफु पाण्याची मागणी, विविध संस्थांचे आरक्षण व सिंचनाचे आवर्तनाचा विचार करता पाणीच उपलब्ध नसल्याचा दावा केला. आमदार खोसकर यांनी दारणा व मुकणे धरणातील साठ्याच्या आकडेवारीवर बोट ठेवत हे आकडे १५ ऑक्टोबरचे असल्याचा दावा केला. तसेच दारणा समुहात मुकणेमध्ये ९५ टक्के नव्हे तर ९० टक्यांच्या आसपास पाणी असल्याची बाब त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मागील वर्षाच्या प्रस्तावांवरच यंदाही आकस्मिक पाण्याचे नियोजन केल्याची तक्रार केली. ओझरखेडची सध्याची परिस्थिती बघता शेवटच्या गावापर्यत पाणी जाण्याची शक्यता कमीच असल्याचा दावा केला. आमदार माणिक कोकाटे यांनीदेखील पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित करत फेरनियोजनाची मागणी केली. पालकमंत्र्यांनी भावनांचा आदर करत ज्या धरणांमधून पाण्याची उचल शक्य नाही तेथील धरणांचा साठा हा त्याभागातील धरण समुहाच्या साठ्यात धरु नये, अशा सूचना केल्या.

फरांदे-कोकाटे जूंपली

आ. फरांदे यांनी गंगापूर धरण समुहातील सद्यस्थिती व आवश्यक पाणी याचे सविस्तर विश्लेषण बैठकीत केले. नाशिक शहरासह सर्व मागणीचा विचार करता उपलब्ध साठा हा मागणीपेक्षा कमी असल्याचे सांगत जायकवाडीला ५०० दलघफु पाणी सोडण्यास विरोध दर्शविला. फरांदे बोलत असताना आ. माणिक कोकाटे यांनी हस्तक्षेप करत जायकवाडीचा विषय आता नको, अशी भुमिका मांडली. त्यावर संतापलेल्या फरांदे यांनी तुम्ही मध्येच बोलुन आमची मुस्कटदाबी करु शकत नाही. नाशिकच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण असून आम्हाला जनतेचे जोडे खावे लागतील. त्यामुळे तुम्ही शांत बसा, असा पलटवार केला.

लष्कराला बोलवा : आहेर

ओझरखेडमधून चांदवड व देवळ्यातील शेवटच्या गावापर्यत पाणी देण्याचा मुद्दा आ. राहुल आहेर यांनी मांडला. ना. झिरवाळ यांनी धरणांची स्थिती लक्षात घेता पाणी देणे शक्य नसल्याचे सांगत तुमच्याकडे डिसेंबरमध्ये बघतो, असे मत व्यक्त केले. त्यावर संतापलेल्या आहेर यांनी धमकी देऊ नका, असे प्रत्त्युतर दिले. तसेच जायकवाडीला बंदोबस्तात पाणी देतात, तसेच आम्हालाही बंदोबस्तात पाणी द्यावे. हवे तर लष्कराला बोलवा, पण आम्हाला हक्काचे आवर्तन देण्याची मागणी आहेर यांनी लावुन धरली. अखेर भुसे यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडला.

हेही वाचा :

The post नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध appeared first on पुढारी.