नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जवळपास ६८ वर्षांची परंपरा असून, ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जाते. शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या या बॅंकेची जिल्ह्याच्या विकासात भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तिला पुन्हा उभी राहण्यासाठी सर्व स्तरावर आपले प्रयत्न सुरू असून, बँक कात टाकणार आहे, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

नाशिक जिल्हा सहकारी बँकेला नाबार्डकडून बँकिंग परवाना रद्द करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ही प्रक्रिया थांबविण्यासाठी जिल्हा बँकेला ॲक्शन प्लॅन तयार करण्याची सूचना केली आहे. राज्य सरकारने भाग भांडवलाबाबत हमी देऊन हा प्रस्ताव नाबार्डला सादर करण्याचे आदेश सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात नाशिक जिल्हा बँक कात टाकणार आहे.

काही वर्षांपासून अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत मंत्रालयात वळसे पाटील यांच्या दालनामध्ये बैठक घेऊन तिचे जिल्ह्याच्या विकासातील, सहकार क्षेत्रातील महत्त्व समजावून सांगितले. अडचणीत असलेल्या या बँकेला वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. बँकेच्या सुधारणेसाठी मी पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून वेळोवेळी बैठका घेत बँकेला आर्थिक संकटातून वर आणण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या कर्जदारांकडून सक्तीची वसुली करण्याबाबत बँकेने कृती योजना तयार करण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत. यात गरीब शेतकऱ्यांना त्रास व्हायला नको, यासाठीही शासनाने वेळोवेळी काळजी घेतल्याचे भुसे यांनी सांगितले.

बँकेने वैयक्तिक सभासद नोंदणीदेखील

जिल्हा बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याच्या निर्णयानुसार बँकेने वैयक्तिक सभासद नोंदणीदेखील मध्यंतरी राबविली असून, त्यासदेखील चांगला प्रतिसाद मिळाल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

The post नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे appeared first on पुढारी.