नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी

चारा वाहतुक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनावरांसाठीच्या उत्पादित चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध चारा परजिल्ह्यात वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तसे आदेश काढले आहेत.

एप्रिलच्या प्रारंभी जिल्ह्याला दुष्काळाचे चटके जाणवत आहेत. प्रमुख २४ धरणांत केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गावागावांत पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत असताना दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही बिकट बनत चालला आहे. जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या जनावरांकरिता महिन्याकाठी एक लाख ८० हजार ८०० टन चाऱ्याची गरज भासते. मात्र, पाण्याअभावी चारा उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यातच उपलब्ध साठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. सद्यस्थिती पाहता ऐन एप्रिलअखेर व मे महिन्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ३) चाऱ्याच्या परजिल्ह्यातील वाहतुकीसंदर्भात आदेश काढले आहेत. यापूर्वीदेखील १३ सप्टेंबर २०२३ रोजी असेच आदेश काढण्यात आले होते.

जिल्ह्यामधील तीन तालुक्यांत शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. तसेच ६० महसुली मंडळांत दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली गेली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थिती बघता जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास व टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांच्या परजिल्ह्यात वाहतूक करण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रसंगी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रभावी अंमलबजावणी करावी

नाशिकमधील उत्पादित चाऱ्याची परजिल्ह्यात वाहतूक होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांतील पोलिस स्थानकांनी खबरदारी घ्यावी. तसेच अशी वाहतूक रोखण्यासाठी गस्ती पथके तसेच तपासणी नाके उभारणी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही आदेशात नमूद आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी appeared first on पुढारी.