नाशिक : ‘त्या’ अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी

कोठडी

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा

गोमांस तस्करीच्या संशयावरून घोटी-सिन्नर मार्गावरील गंभीरवाडी येथे मुस्लीम तरुणाच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 11 संशयित गोवंशरक्षकांना इगतपुरी न्यायालयाने सोमवारी (दि. २६) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

तालुक्यातील सिन्नर-घोटी मार्गावर असलेल्या गंभीरवाडी येथे गोमांस तस्करीच्या संशयावरून १५ ते २० गोवंशरक्षकांनी मिळून मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. 24) सायंकाळी 5.30 च्या सुमारास सिन्नरहून मुंबईकडे गोमांस घेऊन जाणारी स्विफ्ट कार (एमएच ०२, बीजे ६५२५) अडवून कारमधील दोघांना 10 ते 15 जणांच्या जमावाकडून लोखंडी रॉड व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. यात कुर्ला येथील अफान अब्दुल मजीद अन्सारी (३२) याचा मृत्यू झाला, तर नासिर हुसेन कुरेशी (२४) गंभीर जखमी झाला होता. अशीच घटना १५ दिवसांपूर्वी कसारा घाटातील उंटदरीजवळ घडून त्यातही एक मुस्लीम तरुण जीव वाचविताना दरीत पडून ठार झाला.

गंभीरवाडी प्रकरणातील ११ संशयित गोवंशरक्षकांना घोटी पोलिसांनी रविवारी अटक करून भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सोमवारी या ११ संशयित आरोपींना घोटी पोलिसांनी इगतपुरी न्यायालयात हजर केले असता संशयितांचे वकील ॲड. दिनकर खातळे यांनी युक्तिवादात हे सर्व बघ्यांच्या गर्दीत उभे होते आणि त्यांना विनाकारण अटक केली आहे. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करत सर्व ११ संशयितांना येत्या ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास तपास करत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : 'त्या' अकरा गोवंशरक्षकांना सात दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.