नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर

मंगळसुत्र चोरी

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा 

सोनसाखळी चोरी (चेन स्नेचिंग) करणाऱ्या चोरट्यांनी सगळीकडे उपद्रव मांडलेला असतांनाच दुचाकीवरून येऊन महिलांचा पाठलाग करुन सोनसाखळी चोरण्याच्या कामात महिला चोरट्यांची देखील भर पडली आहे. आडगावच्या ज्ञानेश्वर सोसायटी परिसरातून पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या महिलेनेच ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. यात एक महिला चोर व एक पुरुष अशा दोघांचा समावेश असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे.

सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतांना त्यात महिला सोनसाखळी चोरांची देखील भर पडली आहे. या प्रकारामुळे आता पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. ३०) रोजी सायंकाळी आडगाव चौकातून ज्ञानेश्वर सोसायटी रस्त्याने जात असतांना एका दुचाकीवरून आलेल्या जोडप्यापैकी पांढरा रेनकोट परिधान केलेल्या संशयित महिलेने राधिका नरेंद्र मनसुरे यांची साडे चार ग्रॅम सोन्याची १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. आडगाव येथे राहणाऱ्या मनसुरे या महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याने या महिला चोरांचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर appeared first on पुढारी.