नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या

सीमा हिरे www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

दारू दुकान परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पुढाकार घेतला असून, सिडको महाकाली चौकातील लिकर बार आणि दत्त चौकातील देशी दारू दुकान बंद करावे या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत साईबाबानगर, महाकाली चौक व दत्त चौक या मोठ्या रहिवासी वसाहती असून, येथील लिकर बार व देशी दारू दुकानामुळे नेहमी मद्यपींचा वावर असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दारू दुकानांमुळे येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. रोजंदारीने काम करणारे कामगार या दुकानांमुळे व्यसनाचे शिकार होत असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे तर अल्पवयीन मुलेदेखील व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यामुळे महिला वर्गाकडून या ठिकाणची दारू दुकाने त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे. अनेकदा मद्यपींमध्ये हाणामारीच्याही घटना घडत असून, स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या दारू दुकानांमुळे येथील महिला व अल्पवयीन मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत असून, यामुळेच गुन्हेगारीदेखील वाढली आहे. महिलावर्गाला मद्यपींकडून नशेत शिवीगाळ होत असून, छेडछाडीचेही प्रकार होत असल्याने महाकाली चौक व दत्त चौकातील दारू दुकाने स्थानिक नागरिकांकडून बंद करण्याची मागणी होत आहे. निवेदन देताना रश्मी हिरे याही उपस्थित होत्या.
हेही वाचा :

The post नाशिक : दारू दुकानांविरोधात आमदार हिरे सरसावल्या appeared first on पुढारी.