नाशिक : दिंडोरी तालुक्यातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू,www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील वनारवाडी येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. परंतु दिंडोरी रुग्णालयातील अपुर्‍या सोयी-सुविधांमुळे मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील चंद्रभागाबाई नाईकवाडे या महिलेला (दि. 24) पहाटेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात तातडीने तिला लस देण्यात आली, परंतु पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्याते आले. नातेवाईक पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना चंद्रभागाबाई यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यांच्यावर वनारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून, तो प्रस्ताव मंजूर झाला असता तर कदाचित जीव वाचला असता, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

महिलेला रात्री दोनच्या सुमारास सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. पहाटेच्या सुमारास त्यांना दवाखान्यात आणल्यानंतर आवश्यक लस त्यांना देण्यात आली. परंतु पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

– डॉ. समीर काळे, वैद्यकीय अधीक्षक, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय

 

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव तर आहेच. तेथून रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे प्रमाण जास्त आहे. सर्पदंश झालेल्या महिलेचा दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करूनही मृत्यू कसा झाला, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी.

दत्तू भेरे, उपसरपंच वनारवाडी

हेही वाचा : 

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.