पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र

दादा भुसे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार नोकर्‍या देण्याचा शासनाचा मानस असून, त्यातील अनुकंपा भरती हा अत्यंत संवेदनशील व प्राधान्याचा विषय आहे. डिसेंबरअखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया पूर्ण करताना 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्रे देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच ‘शासन आपल्या दारी’ व ‘महाआरोग्य’ अभियान जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना ना. भुसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.7) अनुकंपा भरती, महाआरोग्य अभियान नियोजन व शासन आपल्या दारी अभियानांच्या आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ना. भुसे ते बोलत होते. या बैठकांसाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री भुसे म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या रिक्तपदांचा आढावा घेऊन अनुकंपाच्या नियुक्तीची पदे निश्चित करावी. उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करून ती घोषित करताना आपल्याकडील अनुकंपाची रिक्तपदे शैक्षणिक अर्हतेनुसार तपासून तातडीने भरावीत. विभागवार प्रतीक्षा यादीनुसार पदे भरून झाल्यानंतर उर्वरित प्रतीक्षा यादीतील उमेदवार जिल्हा समितीकडे पाठवून समितीने त्यासाठी शिबिरे, समुपदेशन सत्रांचे आयोजन करत भरतीप्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश ना. भुसे यांनी दिले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एकही अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही ना. भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post पालकमंत्री दादा भुसे : अनुकंपाधारकांना देणार प्रजासत्ताकदिनी नियुक्तिपत्र appeared first on पुढारी.