नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

कांदा उत्पादकांचे आंदोलन,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीसाठी नाफेडचे प्रतिनिधी प्रत्येक बाजार समितीत सहभागी राहणार असल्याच्या आश्वासनाचा नाफेडला विसर पडल्याने गुरुवारी (दि. २४) कांदा लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. चांदवड, लासलगाव, येवला, कळवण तसेच साक्री येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध करत कांदा लिलाव बंद पाडले. नाफेडच्या प्रतिनिधीला लिलावात सहभागी होण्याची जोरदार मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर दुपारी लिलाव सुरू झाले, पण क्विंटलला साधारण दोन हजार रुपये दर मिळाल्याने शेतकरी संतप्त आहेत.

नाफेडच्या मार्फत दोन लाख टन कांदा २,४०० रुपये दराने खरेदीची घोषणा बुधवारी नाशिकला करण्यात आली. डॉ. पवार यांनी जिल्हाधिकारी दालनात बुधवारी बैठक घेताना व्यापारी आणि शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिले. परंतु या आश्वासनाला नाफेडने हरताळ फासल्याने निर्यात शुल्कवाढीवरून पेटलेल्या आंदोलनाची धग दोन दिवसांनंतर लिलाव सुरू होताच कायम राहिली. चांदवडला संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करत दोन तास वाहतूक बंद पाडली. यावेळी प्रहारचे पदाधिकारी, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल सहभागी झाले होते. पोलिसांनी प्रहारच्या जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांना काही काळ ताब्यात घेतले आणि दुपारी सोडून दिले. चांदवडला महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन हजारो वाहने अडकून पडली.

चांदवडप्रमाणेच कळवणलाही दरात घसरण होताच शेेतकऱ्यांनी आंदोलन करत तासभर लिलाव बंद पाडले. येवल्यातही कमी दर मिळताच शेतकऱ्यांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करत लिलाव रोखले. आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू होताच दोन हजारांच्या आसपास दर व्यापाऱ्यांनी पुकारल्याने सकाळी दहालाच शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. दुपारी तीनपर्यंत लिलाव रोखून धरण्यात आले होते. नाफेडच्या प्रतिनिधींना लिलावात सहभागी होण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली. दुपारी बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारदरबारी पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु नाफेडचा प्रतिनिधी सहभागी झालाच पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. लासलगावच्या आंदोलनाने काही शेतकऱ्यांनी आपला कांदा विंचूर बाजार आवारात आणून विक्री केला. तेथे २,५०० च्या आसपास भाव मिळाला. परंतु आवक नाममात्र होती.

साक्रीतही महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको करण्यात आला. सुरत-नागपूर महामार्गावरील शेवाळी फाट्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कोरडा दुष्काळ जाहीर करून शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.

The post नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका appeared first on पुढारी.