नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; चालू वर्षी मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावते आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ८३ टक्के साठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्के त्यामध्ये तूट आहे. उपलब्ध साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवायचा असल्याने आतापासून पाण्याचा काटकसर करणे आवश्यक आहे.

अलनिनाेच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे. मालेगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड या पट्ट्यामध्ये पुरेशा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्येही मर्यादित पाणीसाठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत धरणे ८३ टक्के भरली असून, उपयुक्त साठा ५४ हजार ५६२ दलघफू इतका आहे. २०२२ मध्ये याच कालावधील हा साठा ६५ हजार २४१ दलघफू होता.

गंगापूर धरण समूहातील चार प्रकल्प मिळून ९ हजार ८५९ दलघफू साठा उपलब्ध आहे. यातून ०.५ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडायचे आहे. त्यामुळे उर्वरित पाण्यावर पुढील मान्सूनपर्यंत नाशिक शहराची तहान भागविली जाणार आहे. दारणा समूहात १८ हजार १०१ दलघफू म्हणजे ९६ टक्के साठा आहे. समूहातून २.६४६ टीएमसी पाणी द्यायचे आहे. याव्यतिरिक्त पालखेड समूहात ७८६५ दलघफू (९४ टक्के), तर ओझरखेड समूहात २६३४ दलघफू (८२ टक्के) साठा शिल्लक आहे. गिरणा खोऱ्याचा विचार करता चणकापूर समूहात १४ हजार ३६५ दलघफू पाणी असून, त्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. पुनद समूहात १४१९ दलघफू म्हणजेच ८६ टक्के साठा आहे. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हावासीयांनी पाण्याच्या थेंबाथेंबाचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे.

हेही वाचा :

The post नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक appeared first on पुढारी.