नाशिक : ‘धोंड्याचा महिना’ सजविलेल्या बैलगाडीतून जावयाची मिरवणूक

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘मुलीचा मान व जावयाला वाण’ अशा या धोंड्याच्या महिन्यात बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी मुलगी व जावयाचे अत्यंत हटके पद्धतीने आदारातिथ्य केले. पारंपरिक अन् मराठमोळ्या पद्धतीने जावयाचा मानपान करताना चक्क सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. लेझीम पथक, हलगी, टाळ-मृदंगाच्या गजरात ही मिरवणूक काढली गेली, त्यामुळे परिसरात जावयाचे हे आदरातिथ्य चर्चेचा विषय ठरले.

रविशंकर मार्गावरील शुभभाग्य बंगला परिसरात हा मिरवणूक सोहळा पार पडला. या हटके सोहळ्यात मुली व जावयासाठी मराठमोळा ड्रेसकोड ठरविण्यात आला होता. त्यानुसार जावयाने धोतर, कुर्ता व टोपी परिधान केली होती, तर मुलीने नऊवारीचा शृंगार केला होता. मिरवणूक मार्गात जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांची सजावटही केली गेली. यावेळी जावई आणि मुलीचे अत्यंत हटके पद्धतीने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी हिरण कुटुंबीयांनी यानिमित्त आयोजित केलेल्या मेंहदी सोहळ्याची रंगतही काही वेगळीच होती. या सोहळ्यात हिरण कुटुंबातील तीन आत्या, १३ बहिणी, मुली व सर्व जावई सहभागी झाले होते.

आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. ती नवीन पिढीला समजावी यासाठी ३३ महिन्यांनंतर आलेला अधिक मास हटके पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

– गौतम हिरण

हेही वाचा :

The post नाशिक : 'धोंड्याचा महिना' सजविलेल्या बैलगाडीतून जावयाची मिरवणूक appeared first on पुढारी.