नाशिक : महिला पोलिसांनी उद‌्ध्वस्त केले मद्यनिर्मितीचे अड्डे

महिला पोलिस,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिसांची चार पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत जिल्ह्यातील अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदऱ्यांत गस्त मारून या महिला पोलिस पथकांनी हातभट्ट्यांवर हातोडी, पहारीने प्रहार करीत अड्डे उद‌्ध्वस्त केले आहेत.

नाशिक पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीत अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी विविध पथके कार्यान्वित करून अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात २ हजार आठशे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच कारवाईचा एक भाग म्हणून महिला पोलिस अंमलदारांची पथके तयार करून त्यांनाही हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आहेत. चार पथकांत आठ महिला अंमलदारांचा समावेश आहे. या सर्व पथकांचे नेतृत्व अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे देण्यात आले आहे. या पथकाने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खेडभैरव, देवाचीवाडी, पिंपळगाव घाडगा, चिंचलेखैरे, देवळे आणि तळेगाव या दुर्गम भागांतील गावठी दारू हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या प्रकरणी संशयितांवर इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वर्दीसह साध्या वेशातल्या महिला पोलिसांना गावांमध्ये पाठविण्यात येत असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जातो. तिथे गावठी दारू अड्ड्यांची माहिती मिळाल्यावर पथक प्रमुखांसह हातात पहार व कुऱ्हाड घेत महिला पोलिसांचे पथक डोंगरदऱ्यांत शिरून जमिनीत गाडलेले दारूचे ड्रम काढून नष्ट करीत आहेत. तसेच ड्रममधील दारूसह हातभट्ट्यांवरील मद्यसाठा नष्ट केला जात आहे.

दारूबंदी कारवाई

१ जानेवारी ते ८ ऑगस्टपर्यंत : २,८४८ गुन्हे : ४ कोटी ६ लाख १० हजार ६१२ रुपयांचा मुद्देमाल

९ ते १३ ऑगस्ट : ६ गुन्हे : १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल

ग्रामीण पोलिस दलात २० टक्के महिला अंमलदार आहेत. गावात गेल्यानंतर महिलांकडून त्यांना निश्चितच अवैध दारू अड्ड्यांची माहिती मिळते. महिला पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांच्यासह इतर पथकांचा आत्मविश्वास वाढतो. कारवाईत सातत्य राहते. यासह तंटामुक्त गावासाठीही त्याचा फायदा होतो.

– शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक

हेही वाचा :

The post नाशिक : महिला पोलिसांनी उद‌्ध्वस्त केले मद्यनिर्मितीचे अड्डे appeared first on पुढारी.