नाशिक : नमामि गोदा’साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार

गोदावरी नदी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यात येत असून, डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या आराखड्याचे काम अलमोण्ड्ज कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच कंपनी व मनपाचे अधिकारी पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराचा दौरा करणार असून, गंगा नदी व तेथील घाटांची पाहणी करणार आहेत. सिंहस्थापूर्वी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासन कामाला लागले आहे.

दर १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा नाशिकसाठी विकासाची पर्वणी असून, केंदस्थानी गोदावरी नदी असते.यंदा सन २०२७ मध्ये कुंभमेळा भरणार असून, मनपाकडून नियोजनाची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या नमामि गंगेच्या धर्तीवर दक्षिण गंगा म्हणून प्रसिध्द असलेल्या गोदावरीचे रुपडे पालटवत तिच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जात आहे. तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून नमामि गोदेसाठी १,८२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी मनपाने डीपीआर तयार करण्यासाठी निविदा मागविल्या. त्यात अलमोण्ड्ज कंपनी पात्र ठरल्याने १७ लाख रुपयांना डीपीआर तयार करण्याचे काम देण्यात आले. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा डीपीआर तयार करताना इतर शहरांना भेटी दिल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने गुजरात राज्यातील अहमदाबादमधील साबरमती रिव्हर फ्रंट, वाराणसीतील गंगा नदी, सिंहस्थ जेथे भरतो ते प्रयागराज या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे.

त्यानुसार आधी वाराणसीला भेट देण्याचे ठरले असून, तेथील गंगा नदी स्वच्छता, जगप्रसिध्द ८५ घाटांची साफसफाई, ड्रेनेज सिस्टिम, मलजलशुध्दीकरण प्रकल्प आदींची पाहणी केली जाणार आहे. पुढील काही दिवसांत सबंधित कंपनी व मनपा अधिकारी हे वाराणसीत जाऊन वरील सर्व बाबींची पाहणी करणार असून, आराखड्यात त्याचा समावेश करणार आहे.

असा असेल डीपीआर

गोदावरीची स्वच्छता, गोदा व तिच्या उपनद्यांचे प्रदूषण थ‍ांबवणे, नद्या प्रवाहित ठेवणे, गोदा घाट सुशोभीकरण, नदीपात्रात कारंजे, गोदापात्र आजूबाजूला पर्यटन विकास करणे, पुरातन मंदिरांना गतवैभव प्राप्त करून देणे.

हेही वाचा :

The post नाशिक : नमामि गोदा'साठी करणार वाराणसीचा दौरा; सिंहस्थापूर्वी प्रकल्प मार्गी लावणार appeared first on पुढारी.