नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला

अजित पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष संघटना मजबूत असणे आवश्यक असते. सभासद नोंदणीबाबत पदाधिकाऱ्यांना गांभीर्य राहिलेले नाही. केवळ पदे घेऊन पक्षासाठी वेळ दिला जात नाही. त्यामुळे अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा. बूथ कमिट्या सक्षम करून त्यात सर्व घटकांतील लोकांना सामावून घेण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बाेलत होते. व्यासपीठावर माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते हेमंत टकले, आमदार ॲड. माणिक कोकाटे, सरोज आहिरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, दिलीप खैरे, नाना महाले, डॉ. अपूर्व हिरे, गजानन शेलार, कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा योगिता आहेर, विष्णुपंत म्हैसधुणे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

जनमानसालाही राज्यात बदल हवा आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांनी योग्य उमेदवार दिल्यास तो हमखास निवडून येतो, हे कसबा पोटनिवडणुकीनंतर सिद्ध झाले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी हुरळून न जाता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवावी. पदाधिकाऱ्यांनी आपापसातील गट-तट विसरून भेदभाव न करता एकदिलाने काम करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून जनमानसात पक्षाबाबत विश्वास संपादन करण्याचे आवाहन ना. पवार यांनी केले.

कायकर्ता हा पक्षाचा कणा असतो. महाविकास आघाडी स्थापन झाली असली, तरी स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात निवडणुका लढल्या आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची एकजूट घडवून आणण्यासाठी सभांचे नियोजन करण्यात आले. या सभा यशस्वी करण्याचे आवाहन ना. पवार यांनी केले.

सत्ताधाऱ्यांचे दुटप्पी राजकारण

महापुरुषांबाबत राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून दुटप्पी राजकारण सुरू आहे. सावरकर यांची गौरव यात्रा काढली जाणार आहे. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो. मात्र, बेताल वक्तव्ये करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता. तेव्हा सत्ताधाऱ्यांना गौरव यात्रा सुचली नाही का? असा सवाल ना. पवार यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल बनवा

सध्या नाशिकमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सर्व घटकांतील आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्यांना उमेदवारी द्यावी. या निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल बनवा, असे ना. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ द्या ; आढावा बैठकीत अजित पवारांचा सल्ला appeared first on पुढारी.