नाशिक : पडलेली द्राक्षबाग बघून शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात दाटले अश्रू

नाशिक,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील चिंचखेड येथे शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे. चिंचखेड येथील शेतकरी मधुकर बबेराव फुगट या शेतकऱ्याची दीड एकर द्राक्ष बाग होती. शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे ही द्राक्षबाग पूर्ण जमीनदोस्त झाली.

सहकारी संस्थेचे कर्ज काढून वर्षभर मेहनत कष्ट करून  त्यांनी ही द्राक्षबाग फुलवली.  दोन ते तीन दिवसात या द्राक्ष बागेचा व्यवहार होणार होता परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आता या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. दीड एकर द्राक्ष बागेसाठी प्रत्येक वर्षी साधारण चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. या शेतात साधारण 400 क्विंटल द्राक्षमाल होता. आजचा बाजार भाव बघता 2500 ते 3000 रुपये क्विंटल भाव मिळाला असता. मात्र, द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्याने या शेतकऱ्याचे साधारण दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पडलेली द्राक्ष बाग बघून शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. बागेची तलाठी साकीब शेख यांनी तात्काळ जाऊन पाहणी करून पंचनामा केला. शासनाने ठोस नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकरी कुटुंबाने केली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : पडलेली द्राक्षबाग बघून शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यात दाटले अश्रू appeared first on पुढारी.