नाशिक पोलिसांकडून ललित पानपाटीलचा ताबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी ड्रग्ज आणि ससून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याचा शुक्रवारी (दि.८) रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी ताबा घेतला आहे. शनिवारी (दि.९) त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, नाशिक शहर व जिल्ह्यासह परराज्यात एमडी ड्रग्जचे जाळे कसे निर्माण केले याबाबतची महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा त्याच्याकडून होण्याची शक्यता आहे. (Lalit Patil Drugs Case)

ललितचा ताबा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ललितसह रोहित चौधरी, झिशान शेख, हरिशपंत या तिघांचाही नाशिकच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ताबा घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, नाशिक न्यायालयाने ललितसह अन्य तिघाच्या अटकेचे वॉरंट जारी केले होते. त्यानुसार पोलिसांनी मुंबई गाठून आॅर्थर रोड तुरुंगातून या चौघांचा ताबा घेतला. दरम्यान, ललित पानपाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयातून २ आॅक्टोंबर रोजी फरार झाला होता. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तेव्हापासून नाशिक, पुणे आणि मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. तो पुण्यातून फरार झाल्यानंतर नाशिकमध्ये मुक्कामी राहिला होता. येथून त्याने २५ लाखांची रोकड घेऊन पुढे पोबारा केला होता. त्याला बंगळुरूमधून पकडण्यास मुंबई पोलिसांना यश आले होते. त्याची मुंबई पोलिसांकडील कोठडी संपल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत कसून चौकशी केली होती. ललितसह एकुण १४ जणांच्या टोळीवर पुणे पोलीस आयुक्तालयाकडून मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ललितला मुंबई न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नाशिक पोलिासांकडून आता त्याचा ताबा घेण्यात आल्याने, बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

याचा होणार उलगडा

– शिंदे गावात उभारण्यात आलेल्या एमडी पावडर व कच्चा मालाच्या गोदामाबाबत होणार चौकशी

– संशयित संजय ऊर्फ बंटी काळे व समाधान कांबळे या दोघांचा चौकशीतून लागणार सुगावा

– ललितच्या राजकीय गॉडफादरच्या नावांचाही उलगडा होण्याची शक्यता

– नाशिक जिल्ह्यातील त्याच्या आणखी साथीदारांची नावे येणार समोर

– जिल्ह्यातील ड्रग्ज पेडलरच्या साखळीची माहिती मिळण्याची शक्यता

– चौकशीतून राज्यस्तरावरील रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता

The post नाशिक पोलिसांकडून ललित पानपाटीलचा ताबा appeared first on पुढारी.