नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला

नाशिक (सायखेडा) : पुढारी वृत्तसेवा
शेती अन् अस्मानी संकटे शेतकर्‍यांना नवीन नाहीत. अशा अगणित संकटांना सामोरे जात नाशिकचा शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन सनदी लेखापाल होऊन पुढे आयपीएस होतो. शेतीशी नाळ जोडलेला अधिकारी म्हणून सचिन पाटील यांनी चांदोरी गावातील शेतकर्‍याची अदबीने चौकशी करीत भेट दिल्याने सर्वसामान्य शेतकरी सुखावला आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे कामानिमित्त ग्रामीण भागातील निफाड दौर्‍यावर आले असताना, त्यांना चांदोरी गावाच्या शिवारात शेतात नांगर चालवत असलेला शेतकरी दिसल्याने त्यांनी वाहन थांबवून आपुलकीने या शेतकर्‍याची विचारपूस केली. मोठे अधिकारी आपल्या शेतात येऊन चौकशी व शेतीकामाबद्दल विचारणा करीत असल्याने शेतकरी गणेश एकनाथ खेलूकर आनंदाने भारावले. आपल्यासारख्याच सर्वसामान्य शेतकर्‍याच्या शेतात खुद्द पोलिस अधीक्षक येऊन अडीअडचणींची विचारपूस करतात, त्यामुळे या शेतकर्‍याला सुखद धक्काच बसला. या भेटीमुळे सर्वसामान्यांची काळजी घेणारे पोलिस अधीक्षक म्हणून पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचे नाव जिल्ह्यात चर्चिले जात आहेत. कृषी दिन साजरा होत असताना सर्वसामान्यांची अदबीने केलेली चौकशी भारावून गेली.

परिस्थिती कुठलीही असो, बळीराजाने पेरायचे आणि संकटांनी त्याला घेरायचे कधी सोडलेले नाही. अशा शेतात घाम गाळून जगाची भूक भागवणार्‍या तमाम शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शतशः नमन..!
– सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिस अधीक्षकांच्या भेटीने शेतकरी सुखावला appeared first on पुढारी.