नाशिक : भुसेविरोधाच्या ‘मातोश्री’ ते ‘मधुर मुरली’ पॅटर्नबाबत उत्सुकता

अद्वय हिरे,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) सुदर्शन पगार

संकेत दिल्याप्रमाणे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष डॉ. अद्वय हिरे यांनी शुक्रवारी (दि.27) समर्थकांसह भारतीय जनता पक्षाला राम राम करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. याप्रसंगी त्यांनी केलेल्या निवेदनातच या निर्णयामागील भूमिका पुरेशी स्पष्ट आहे. भुसेविरोध हा एकमात्र अजेंडा असल्याने प्राप्त पर्यायातील ठाकरे गटाचा मार्ग चोखाळत आपली उमेद कायम असल्याचाच त्यांनी संदेश दिला आहे. आता हा मातोश्री ते मधुर मुरली (अद्वय यांचे निवासस्थान) पॅटर्न यशस्वी ठरेल का? हीच उत्सुकता आहे.

काँग्रेस आणि हिरे घराण्याचा बालेकिल्ला अशी ओळख असणार्‍या पूर्वाश्रमीच्या दाभाडी विधानसभा मतदारसंघात 2004 मध्ये दादा भुसे यांनी चमत्कार घडविला. त्यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे वारसदार माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा पराभव करीत जी राजकीय घोडदौड सुरू केली तिला तोड नाही. जिल्ह्यात शिवसेनेची पीछेहाट होत असताना भुसेंनी विजयी चौकार मारत राज्यमंत्री ते थेट कॅबिनेट मंत्रिपद काबीज करत जिल्ह्यातील हेवीवेट राजकारणी होण्यापर्यंत मजल मारली. या वाटचालीत त्यांचे कट्टर विरोधक म्हणून हिरे घराण्याचे डॉ. अद्वय हिरे यांची प्रारंभीपासूनच छबी टिकून आहे.

माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या पराभवानंतर त्यांचेच निष्ठावंत पवन ठाकरे यांचा 2014 मध्ये आणि गेल्या निवडणुकीत हिरे घराण्याशीच निगडित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा पराभव करीत भुसेंनी सलग चार वेळा निवडणूक जिंकून येण्याचा इतिहास घडविला. या एकूणच घटनाक्रमांत पहिल्यावेळी पाठीराखे असणार्‍यांमध्ये गळती होत जाऊन विरोधकांची मोट बांधली गेल्यानंतरही भुसे यांचा मतटक्का हा चढताच राहिला आहे. भुसे बाहुबली झालेले असताना त्यांच्याशी टक्कर घेण्याची हिंमत आजघडीला केवळ डॉ. अद्वय हिरे यांच्यातच असल्याचे मानले जाते. मात्र, वास्तवात प्रत्येक आघाडींवर त्यांना भुसेंनी शहच दिला आहे.

हिरे घराण्याचा काँग्रेसपासून सुरू झालेला प्रवास राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपमार्गे आता पुन्हा शिवसेना असे वर्तुळ पूर्ण करण्यासही भुसेच कारणीभूत ठरले आहेत. भाजपच्या संघर्ष काळात 2009 मध्ये हिरे कुटुंबाने त्या पक्षाचे बोट धरले होते.  आज भाजप दमदार स्थितीत असताना आणि त्यातही शिवसेना-भाजप युती तुटल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी मिळेल, अशी अटकळ हिरे बांधून होते. परंतु, राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना दुभंगली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास भाग पाडणारा गट भाजपच्या वळचणीला गेला. त्या शिलेदारांमध्ये भुसे यांचे स्थानही लक्षवेधी असल्याने, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले त्यांचे सख्य पाहता भाजपत रहायचे तर भुसेंच्या मांडीला मांडी लावून बसण्याशिवाय हिरेंसमोर पर्याय राहिला नव्हता. ते त्यांना मान्य होणे शक्य नसल्याने अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रवेश प्रत्यक्षात आला आहे.

अद्वय हिरेंसमोर आव्हान
डॉ. अद्वय हिरे यांचा स्वतंत्र बाणा हा नेहमी पक्षाला आव्हानात्मक ठरत आला आहे. भाजपत असतानाही तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे असो की, इतर स्थानिक पदाधिकारी यांच्याशी उडालेले खटके सर्वश्रुत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश हा कळीचा मुद्दा असणार्‍या ठाकरे गटातील त्यांची वाटचाल औत्सुक्याची ठरणार आहे. तसेच भुसेंपासून अलिप्त होऊन दुखावले गेलेल्यांची मोट बांधण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल.

हेही वाचा : 

The post नाशिक : भुसेविरोधाच्या 'मातोश्री' ते 'मधुर मुरली' पॅटर्नबाबत उत्सुकता appeared first on पुढारी.