नाशिक : भेसळयुक्त भगरीमुळे 33 जणांना विषबाधा

अंदरसूल/सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल व भारम प्राथमिक केंद्रांतर्गत भेसळयुक्त भगरीच्या सेवनातून दोन दिवसांत तब्बल 33 नागरिकांना विषबाधा झाली असून, सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथेही 12 जणांना विषबाधा झाली आहे.

नाशिक जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. उदय बरगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे, आरोग्य विस्तार अधिकारी आर. एस. खैरे यांच्या आरोग्य पथकाने अंदरसूल व भारम आरोग्य केंद्रात भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली.

नवरात्र उत्सवात उपवासासाठी भेसळयुक्त भगर खाण्यात आल्याने भुलेगाव, देवठाण, पिंपळखुटे, सुरेगाव तसेच अंदरसूल येथील काही नागरिकांना विषबाधा झाली. या प्रकाराने जिल्हा आरोग्य यंत्रणा व अन्नभेसळ प्रतिबंधक खाते खडबडून जागे झाले. बुधवारी (दि. 28) आरोग्य पथकाने तातडीने अंदरसूल येथे धाव घेऊन रुग्णांकडून माहिती घेतली. रुग्णांच्या घरातील भगर व दुकानदारांकडून भगरीचे नमुने परीक्षणासाठी ताब्यात घेतले आहेत. हे नमुने हे अन्नभेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद तारू, डॉ. जयश्री पवार, डॉ. प्रिया अहिरे हे रुग्णांवर उपचार करत आहेत. दोन दिवसांत खासगी व शासकीय आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झालेले 31 रुग्ण बरे झाले असून, उर्वरित दोन रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

दरम्यान, अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी अंदरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन माहिती घेतली. अंदरसूल व परिसरातील डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेत भगर सेवन करताना खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात आले.

सोमठाणेत भगरीतून दहा ते बारा जणांना विषबाधा

तालुक्याच्या पूर्व भागातील सोमठाणे येथे भगरीच्या भाकर व थालीपीठ खाल्ल्याने दहा ते बारा जणांना जुलाब, चक्कर आणि डोळ्यांना अंधाऱ्या आल्याची प्रकार घडला.  नवरात्र उत्सवात बहुतांश महिलांना उपवास असल्याने भगरीच्या भाकर व थालीपीठ बनवून खाल्ले जाते. सोमठाणे येथील पदाडे वस्तीवरील पताडे कुटुंबीयांनी स्थानिक दुकानदाराकडे भगर घेऊन ती दळून घेतली होती.

स्थानिक दुकानदाराने अहमदनगर येथून भगर खरेदी केल्याची समजते. भगरीचे भाकर व थालीपीठ खाल्ल्याने पदाडे कुटुंबातील दहा ते बारा जणांना जुलाब चक्कर आणि अंधाऱ्या आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर या सर्वांना सोमठाणे येथील डॉ. होळकर व डॉ. भोईकर यांच्याकडे उपचार करण्यात आल्याची माहिती सरपंच भारत कोकाटे यांनी दिली.   त्रास झालेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. काहींना सलाईन, इंजेक्शन व गोळ्या औषधे देण्यात आले. आता या सर्वांची प्रकृती सुधारली असल्याची माहिती सरपंच भारत कोकाटे यांनी दिली. या सर्वांना  भगरीतूनच त्यांना त्रास झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : भेसळयुक्त भगरीमुळे 33 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.